जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, लांजा, साखरपा या उत्तर भागातील विविध गावे, वाड्या, वस्त्यांमधील दळणवळण अधिक मजबूत होणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये १७३ कोटी ११ लाखांच्या निधीतून ८१ पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही पूर्ण झाली, तर काही प्रगतिपथावर आहेत. उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुलांच्या कामाचा सपाटा लावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (उत्तर) ही कामं पूर्ण झाल्यास उत्तर रत्नागिरी दळणवळणाच्या दृष्टीने पुढारेल. ग्रामीण भागातील अनेक गावे, वाड्यावस्त्या, रस्ते, साकव पूल नसल्याने संपर्कात नाहीत. त्यामुळे अशा गावांचा पायाभूत विकास खोळंबतो. आरोग्य, शैक्षणिक विकास खुंटतो. उत्तर विभागात सुरू असलेल्या ८१ पुलांमुळे संपर्कात नसणारी गावे, वाड्या विकासाच्या प्रवाहात येणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे-वांद्री रस्त्यावरील पूल बांधण्यात येत आहे. साखरप्यातील भडकंबा भोवडे येथील राममंदिर व हनुमान मंदिर येथील मोठे पूल, राजापुरातील भालावली ते अळवाची फांदी या राज्य मार्गावरील पूल, देवरुखातील हरपुरे-बेलारी-कुंडी ते जिल्हा सीमेपर्यंतच्या रस्त्यावरील कॉजवे, रत्नागिरी तालुक्यातील ओरी-धामणसे-नेवरे रस्त्यावरील लहान पूल, मिरजोळे-वांद्री रस्त्यावरील कमकुवत झालेल्या पुलाची पुनर्बाधणी, आगवे -कुरतडे-चांदेराई रस्त्यावरील पूल, लांजा तालुक्यातील वेरवली-कोर्ले-प्रभानवल्ली-खोरनिनको-विशाळगड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, राजापुरातील व्हेळ-रिंगणे-पाचल पुलाचे काम तसेच मूर-काजिर्डा पूल, सौंदळ तुळसवडे, ताम्हाणे रस्त्यावरील पूल अशा राजापूर तालुक्यातील पुलांचा समावेश आहे.
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी – परचुरी-कुरधुंडा आदी भागांसाठी लहान पूल, मारळ-निवधे-गळवाडी-धनगरवाडी रस्त्यावरील पूल, आरवली-मुरडव-कुंभारखाणी-कुचांबेतील पुलाची पुनर्बाधणी. रत्नागिरी तालुक्यातील चाफे-निवेंडी-मालगुंड पुलाचे काम, उंडी-रिळ-वरवडे पुलाचे काम, हरचेरी-देवधे रस्त्यावरील पूल अशा प्रकारे रत्नागिरी, राजापूर, लांजा, साखरपा, देवरूख भागातील ८१ पुलांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी १७३ कोटी ११ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे.
वाड्या वस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार – ग्रामीण भागात नदी, ओढ्यांवर पूल नसल्याने काही गावांचा संपर्क नसतो किंवा तेथील ग्रामस्थांना दळणवळणाच्यादृष्टीने वळसा मारावा लागतो. आता उत्तर रत्नागिरीतील हा प्रश्न सुटणार आहे. सर्व गाव, वाड्या, वस्त्या पुलांची कामे पूर्ण झाल्यास विकासाच्या प्रवाहात येऊन समृद्धीच्या दृष्टीने वाटचाल करतील.