चिपळूण तालुका सध्या कोणत्या न कोणत्या विषयांवरून चर्चेतच आहे. महापूर आल्यापासून अनेक ठिकाणचे पाणी साठे हे काही प्रमाणात दुषित झाले आहेत. मागील सहा महिने चिपळूण शहरात दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असताना प्रशासनाला वारंवार सांगून देखील जलशुद्धीकरण प्रक्रिया सुस्थितीत व सुरळीत राखण्याचे काम का केले नाही? या विषयावरून शुक्रवारी सकाळी ११ वा. चिपळूण नगर परिषदेची तातडीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रशासनाला चांगलाच जाब विचारण्यात आला आहे.
विषय पत्रिकेवर बहुतांश विषय हे रखडलेल्या विकासकामांना मुदत वाढीसहीत अन्य विकासकामांची प्रशासकीय व आर्थिक मंजुरी घेण्याबाबत होते. त्यामधील १८ विषय चर्चा व मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. चिपळूण नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेमध्ये खेर्डी जॅकवेलमधील वाळू बदलणे या विषयाबरोबरच मार्कंडी संभाजी चौकातील गटाराच्या कामास मुदतवाढ देण्याच्या विषयांच्या निर्णयावरून सर्व सदस्यांनी प्रशासनाला विविध मुद्दे उपस्थित करीत धारेवर धरले.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे होत्या. शहरातील पाणीपुरवठा संदर्भात खेर्डी जॅकवेल येथील जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणेकामी व संभाजी चौकातील भागवत घर, मधुकर सायकल मार्ट ते पवन तलाव मागील बाजूचे गटार बांधकामाला मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने सभागृहासमोर अहवाल ठेवला.
तासभराच्या चर्चेनंतर सविस्तर माहिती देण्याबाबत प्रशासनाच्या संबंधित अधिकार्यांना तासभर वेळ देण्यात आली. त्यानंतर सविस्तर माहिती अंती, सुमारे ६० ब्रास वाळू लागणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका फैरोजा मोडक यांनी, आपण पाणी सभापती असताना दीड वर्षांपूर्वी सर्व जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलण्याबाबत अंदाजपत्रके बनवून प्रशासनाला दिली. त्यानंतर एवढ्या मोठ्या कालखंडाने सुमारे दीड वर्षाने हा विषय सभागृहासमोर आणला जातो, हे दुर्दैव. तसेच वाळू घ्यायची असल्यास गुजरात राज्यामधील चांगल्या दर्जाची घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.