ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात येथील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांना जाब विचारला. यावर फेब्रुवारी अखेर ते मार्चपर्यंत बिले अदा होतील, अशी ग्वाही रामसे यांनी ठेकेदारांना दिली. तर ठेकेदारांच्या थकीत देयकांबाबत चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंतांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षांपूर्वी ठेकेदारांची बिले नियमित अदा होत नाहीत. कोट्यवधी रुपयांची कामे करून ‘देखील बिले अदा होत नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. यामध्ये आता तर आणखी भर पडली आहे. यामुळे ठेकेदार हतबल झाल्याने, चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे – यांच्यावर थकीत देयकांबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. अभियंता रामसे यांनी फेब्रुवारी अखेर ते मार्चपर्यंत बिले अदा होतील, अशी ग्वाही दिली.
संघटनेतर्फे रामसे यांना निवेदन देण्यात आले. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची मागील ३ ते ४ वर्ष अनेक देयके आपल्या ‘विभागाकडे थक्ली आहेत. आपल्या विभागाकडून बजेट, नाबार्ड, एसआर व इतर हेडमधील कामे मोठ्या प्रमाणात काढली गेली व ठेकेदारांकडून करूनही घेण्यात आली. परंतु देयके देताना कधी ५ टक्के तर कधी १० टक्के सरासरी प्रमाणे देयके करण्यात आली. ठेकेदारांचे करोडोंचे रुपयांची देयके आपल्या विभागाकडे प्रलंबित आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ठेकेदारांची करोडो रुपयांची देयके प्रलंबित असतानाही कामे पूर्ण करण्यासाठी वारंवार फोन व पत्र व्यवहार करून मानसिक त्रास देण्यात येत आहे. थकीत देयकांमुळे बँक व आर्थिक संस्था यांच्या वसुलीचा सतत असणारा तगादा व त्यातूनच उपअभियंतांचे काम पूर्ण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या त्रासामुळे ठेकेदारांचे मानसिक संतुलन बिघडून ते वाईट मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँकांकडून कर्ज घेऊन कंत्राटदार कामे करतात. परंतु सरकारकडून पैसे मिळाले नसल्याने कंत्राटदारांना बँकेकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर ठेकेदारांना आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी ठेकेदार सुरेश चिपळूणकर, गणेश कांबळे, सुरेश पवार, केतन पवार, रणजीत डांगे, मल्लू राठोड, स्वप्निल जाधव, विकास घाग, राहुल पवार, शिवाजी राठोड, प्रथमेश राठोड, शंकर पवार, राहुल गोपाळ, श्रीधर खेतले, मयूर खेतले, बाबू साळवी, पंकज माटे, सचिन चव्हाण, राम नार्वेकर, निवास नलावडे, राजू पवार, तुषार सुर्वे, श्रीधर बागकर, श्री. पोटे, अनिल चिले, अनिल साळुंखे, नागेश घोसाळकर, निळकंठ राठोड, दीपक जाधव, राजू खेडकर आदी ठेकेदार उपस्थित होते.