गणेशोत्सव आणि येणाऱ्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने कोकणात दाखल होत आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिले. प्रकाश शिंदे आणि संजय वैशंपायन ज्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सव आणि येणाऱ्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची रहदारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
महिलांना ५० टक्के सवलत जाहीर झाल्यानंतर एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक आणि रेल्वेफाटा हे बसस्टॉप एसटीच्या आरक्षण प्रणालीमध्ये आणावे तसेच एसटी महामंडळाने रेल्वे महामंडळासोबत चर्चा करून कायमस्वरूपी नियंत्रण कक्ष रेल्वेस्टेशन रत्नागिरी येथे सुरू करावा, असे निवेदन प्रकाश शिंदे व संजय वैशंपायन यांनी आज दिले. गणेशोत्सव काळासाठी पुरेशा बसेस उपलब्ध असल्याचे बोरसे यांनी सांगितले.