नवरात्रीला ७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरुवात होत असून, मंदिरे सुद्धा कोरोना काळापासून साधारण दीड वर्षानंतर उघडली जाणार आहेत. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे पालन करूनच मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या अनुषंगाने कोल्हापूर शहर आणि अंबाबाई मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी.
अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आत्ता भाविकांसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृह, संसदीय कार्य, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित नवरात्र महोत्सव व कोल्हापूर शहरातील रस्त्यातील खड्ड्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटीलनी पुढे सांगितले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात सर्व भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून प्रत्येक तासाला अंदाजे पाचशे भाविकांना व्यवस्थित दर्शन करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ऑनलाईन बुकिंगसाठी दि.५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दिनांक ७, ८ व ९ ऑक्टोबर या तीन दिवसासाठीचे ऑनलाईन बुकिंग भाविकांना करणे शक्य होणार आहे. त्यानंतर पुढील दिवसांचे बुकिंग करता येणार आहे. ऑनलाईन बुकिंग लिंक लवकरच कार्यान्वित करुन उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविक त्यांना दिलेल्या स्लॉटप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात येतील, त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची अधिक गर्दी होणार नाही. तसेच शासनाने आखून दिलेल्या कोरोनाच्या नियमाचेही पालन शक्य होइल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.