महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचा राज्यारोहण सोहळा गुरुवारी सायंकाळी जनसागराच्या साक्षिने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यातील मुख्यमंत्री तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना राज्यपाल राधाकृष्णन् यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यानंतर कार्यक्रमस्थळी तसेच महाराष्ट्रात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच भाजप आणि एनडीए शासनाचे २२ मुख्यमंत्री यांच्यासह उद्योगपती, सिने कलाकार, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, चहावाला असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रॅण्ड सोहळा – महायुतीचा हा राज्यारोहण सोहळा ग्रॅण्ड व्हावा यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला होता. एकूण तीन मंच उभारण्यात आल होते. त्यातील एका मंचावर प्रसिद्ध संगितकार अजय अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर दुसऱ्या मंचावर नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांर्ना आशिवार्द देण्यासाठी देशभरातील ४०० हून अधिक साधूसंत उपस्थित होते.
राष्ट्रगीत आणि राज्यगीत – ठिक ५.३०वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर आगमन होताच पोलिसांच्या बँडवर राष्ट्रगीताची धून वाजली आणि सोहळा सुरू झाला. राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्र राज्यगीतही सादर झाले. त्यानंतर शपथविधीला सुरुवात झाली.
देवाभाऊंची शपथ – मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात महाराष्ट्राचे २१वे मुख्यमंत्री म्हणून -भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन् यांनी त्यांना शपथ दिली. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे नाव घेत त्यांनी मातेचाही गौरव केला. यावेळी शामियानात उपस्थित असलेल्या त्यांच्या हजारो चाहत्यांनी जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांची शपथ पूर्ण होताच मैदानाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे आभार मानले तसेच पंतप्रधानांचे आशिर्वाद घेतले.
बाळासाहेंबाचे स्मरण – त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ वाचण्यापूर्वी हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत स्मरण केले. तसेच देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदराने उल्लेख करत महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे आभार मानत ‘मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे’ असे म्हणत त्यांनी गांभिर्यपूर्वक शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांचे आभार मानले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठिवर थाप मारली. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले..
अजितदादांची शपथ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित आशाताई अनंतराव पवार यांनीही गांभीर्यपूर्वक शपथ ग्रहण केले. अजित पवार यांनी शपथ घेताच राज्यपालांचे आभार मानले. पंतप्रधानांचे आशिर्वाद घेतले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अनेक दिग्गजांची उपस्थिती – या ग्रॅण्ड सोहळ्याला २२ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गुजरातचे भूपेंद्र पटेल, मध्यप्रदेशचे मोहन यादव, छत्तीसगडचे विष्णूदेव सहाय, राजस्थानचे भजनलाल, हरियाणाचे नायबसिंह सैनी, आसामचे हेमंत बिस्व शर्मा, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे पुष्करसिंह धामी, बिहारचे नितीशकुमार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवनकुमार यांच्यासह ईशानेकडील राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
तारे-तारकाही उपस्थित – बॉलीवूडमधील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, जान्हवी कपूर, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, रणबीर सिंह, रणवीर कपूर, माधुरी दीक्षित, जॅकी श्राफ आदी कलाकारांचा त्यामध्ये समावेश होता. क्रिकेटचा देव मानला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर हा देखील उपस्थित होता.
धर्मगुरुंची उपस्थिती – देशभरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक साधूसंत महंत यावेळी आशिवार्द देण्यासाठी उपस्थित होते. सोहळ्याला विरोधीपक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी वैयक्तीक कारणास्तव उपस्थित राहता येत नाही असे कळवत शुभेच्छा संदेश पाठविले.
४० हजारांची उपस्थिती – विविध उद्योगपती देखील या समारंभाला उपस्थित होते. त्याशिवाय राज्यभरातील ४० हजार नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अतिशय देखणा असा हा सोहळा झाला. या सोहळ्यानंतर राज्यभरातील अनेक जिल्ह्यात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.