रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून तीन-चार ठिकाणी लहान कोरोना बाधित मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. लहान मुलांचे मनोरंजन व्हावे आणि या आजारातून लवकर बरी होऊन घरी परतावी यासाठी विविध प्रकारचे सुशोभीकरण, खेळणी, पुस्तक यांची सुविधा प्रत्येक सेंटर मध्ये करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जास्तीत जास्त प्रभाव लहान मुलांवर होऊन ती बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्येच साधारण ३ हजारच्या आसपास मुले कोरोना बाधित झाली. परंतु, जिल्ह्यातील मुलांची प्रतिकार क्षमता चांगली असल्याने त्यांना या महामारीवर यशस्वीरित्या मात करता आली.
रत्नागिरीतील सामाजिक न्याय भुवन कुवारबाव येथील लहान मुलांच्या कोविड सेंटरमधील मुलांनी आणि मातांनी एक विचित्र अनुभव घेतला. अचानक या बाधितांना सामाजिक न्याय भुवन मधून शिवाजी स्टेडीयम मधील कोविड सेंटर मध्ये हलवण्यात आले. परंतु, तेथे असणार्या अपुर्या सोयींमुळे सर्व मातांनी तेथे वास्तव्य करण्यास असमर्थता दर्शवली. आणि आम्हाला पुन्हा आधी होतो तेथे सामाजिक न्याय भुवन मध्ये हलवा अशी मागणी केली. शिवाजी स्टेडीयम येथील कोविड सेंटरमध्ये खाटा नसल्याने, जमिनीवरच गाद्या टाकण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे पाण्याची सोयही अपुरी असून, स्वतंत्र शौचालयाची सुविधा देखील अपुरी असल्याने बाधित लहानग्यांनी आणि त्यांच्या मातांनी तिथे राहण्यास नकार दिल्याने, आरोग्य विभागाची एकच खळबळ उडाली.
आरोग्य विभागावर जरी ताण असला तरी, प्रत्येक बाधिताला योग्यच सुविधा मिळणे गरेजेचे असल्याचे अनेकानी मत व्यक्त केले. सामाजिक न्याय भुवनाचा परिसर मोठा असल्याने तेथे बाधित रुग्णांसाठी सर्व सोयी आहेत. अखेर संध्याकाळी मातांच्या मागणीवरून आरोग्य विभागाने पुन्हा त्यांना सामाजिक न्याय भुवन येथे हलविले.