रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये कोविड विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. शासनाकडून कोरोना लसींचा पुरवठा वाढवला गेला असून, प्रत्येक गावात व्यापक प्रमाणात जनजागृती व जनतेचा सहभाग मिळवणे गरजेचे आहे. यासाठी जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यासह राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्याकमी होत चालली आहे. असे असले तरी अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. लसीकरण मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. मात्र, लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ उडत होता.
मात्र शासनाने आता हा पुरवठा नियमित व मोठ्या प्रमाणात सुरू ठेवला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्याकरीता प्रत्येक गावागावात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर जनतेचा सहभाग मिळवण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी जि. प.च्या आरोग्य विभागाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच पालकमंत्री अनिल परब, राज्यमंत्री उदय सामंत, जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्या सूचनेनंतर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मोहिम ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक गावात आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे दिव्यांग तसेच ज्यांना केंद्रापर्यंत येणे शक्य होणार नाही, त्यांना घरी लस देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये कोविड लसिकरण नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांचा समावेश असणार आहे. या लसीकरण मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त जनतेने घ्यावा, असे आवाहन सीईओ डॉ. इंदूराणी जाखड व जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.