शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून कोणालाही सवलत मिळणार नाही, असा इशारा पालिकेने दिला आहे. के. सी. जैन नगरातील विकास योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यावर असलेले पत्र्याचे गाळे काढण्याबाबतची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली आहे. नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हे अनधिकृत गाळे काढण्याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. शुक्रवारपासून (ता. २३) कोकणनगर येथील रस्त्याकडचे अनधिकृत गाळे हटवण्यास सुरुवात होणार आहे. नगरपालिकेसह सार्वजनिक बांधकाम आणि विमानतळ प्राधिकरण संयुक्तपणे ही कारवाई करणार असल्याचे नगर अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले. शहराच्या के. सी. जैननगरात विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यामध्ये सहा पत्र्याचे गाळे आहेत. या गाळ्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, रत्नागिरी पालिका आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही गेल्या चार वर्षांत स्थानिकांकडून तक्रारी झाल्या; परंतु पालिकेच्या प्रशासक काळात या बाबतीत कारवाई करण्याकडे दुर्लक्ष झाले.
आता हे गाळे हटवण्यासाठी नूतन नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात आला आहे. शहरातील रस्ते, गटारे, फुटपाथवर केलेली अतिक्रमणे स्वतःहून काढण्यासाठी रत्नागिरी पालिकेकडून जाहीर नोटीस काढली होती. कोकणनगरातील काही व्यावसायिकांकडून काही अंशी प्रतिसाद मिळाला; परंतु पूर्ण प्रतिसाद न मिळाल्याने पोलिस बंदोबस्तात कोकणनगरातील अतिक्रमण हटवण्यास सकाळपासूनच प्रारंभहोणार असल्याचे नगर अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले. शहराच्या के. सी. जैन नगरात असलेले पत्र्याचे गाळे हटवण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील अपेक्षित कारवाई केली जाणार आहे. या ठिकाणी टेलर, लाँड्री, सलून व इतर दुकाने आहेत. अतिक्रमण हटावची कारवाई शुक्रवारपासून सुरू होत असल्याने अतिक्रमणाला कोणतीही सूट न देण्याच्या मनःस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाहतूक कोंडी होणार दूर – शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. अतिक्रमण हटावाचे काम उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नूतन नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हे अनधिकृत गाळे काढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पालिकेने अतिक्रमण हटावाची ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

