सावर्डे बाजारपेठ परिसरात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण नव्याने झालेले आहे; मात्र दीड दोन वर्षातच या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. चिपळूण-सावर्डे मार्गावर काँक्रिटीकरणाला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे महामार्गासंबंधित प्रलंबित कामे गणेशोत्सवापूर्वी मार्गी न लागल्यास राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सावर्डे ग्रामस्थांनी दिला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथे काही कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत. अनेक कामे अर्धवट स्थितीत असून, त्याकडे दुर्लक्ष कले जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. सावर्डे गाव हा ३५ ते ४० गावांचा केंद्रबिंदू असल्याने येथे येणाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. शिवाय या सर्व गावांची प्रमुख बाजारपेठ सावर्डे असल्याने या बाजारपेठेतून जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला जिथे जिथे तडे आणि खड्डे पडले अशा खड्ड्यांमध्ये दुचाकीस्वार किंवा चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
वाढलेल्या डिव्हायडरमध्ये गवताची स्वच्छता करण्यात यावी. रहदारीच्या ठिकाणी मोठे स्ट्रीटलाईट लावण्यात यावेत. बाजारपेठेतील महामार्गावर काही ठिकाणी महामार्गाला क्रॉसिंग असलेल्या इलेक्ट्रिक ओव्हरहेड वायर काढण्यात याव्यात. सावर्डे डेरवणफाट्यावरील इलेक्ट्रिक पोल सध्या पडण्याच्या स्थितीत आहे. पावसाळ्यात वादळीवाऱ्यामुळे हा पोल एका बाजूला कलंडला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने दुरुस्ती आवश्यक आहे. या सर्व प्रलंबित व महामार्गाची अर्धवट राहिलेली कामे गणपती उत्सवापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी सावर्डे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
अपघात होऊ शकतो – बाजारपेठेत महामार्गाला ज्या ज्या ठिकाणी सेवारस्त्यासाठी वळण ठेवलेले आहेत तेथे मोठा अपघात होऊ शकतो. काही ठिकाणी महामार्गाची उंची सेवारस्त्या पेक्षाही दोन ते सव्वादोन फूट उंच असल्याने या ठिकाणी अपघात होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. संध्याकाळच्या वेळेस बाजारपेठ महामार्गावर लावलेल्या स्ट्रीटलाईट या कधी अर्ध्या चालू होतात तर अर्ध्या बंदच राहतात. काही ठिकाणी महामार्गावरती ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या रस्त्याला नामदर्शक फलक लावलेले नाहीत.