बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे एक अनोखे नाते आहे. खूप आधीपासून अनेक बॉलीवूड कलाकारांनी क्रिकेट मधील खेळाडूंशी संसार थाटले आहेत. त्यामुळे कालांतराने आताची पिढी सुद्धा यामध्ये पाठी राहिलेली नाही. कालच्या आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये टीम इंडिया आणि स्कॉटलंडच्या संघामध्ये सामना खेळला गेला होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने स्कॉटलंडचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या सामन्यात सलामीवीर केएल. राहुल याने चौकार-षटकारांची आतिषबाजी करत १८ चेंडूमध्ये ५० रन्स ठोकले. त्याच्या कामगिरीची आणि त्याच्या एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये युवराज सिंह याच्यानंतर सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम काल राहुलने केला आहे. राहुलची ही खेळी पाहण्यासाठी त्याची प्रेयसी आथिया शेट्टी देखील मैदानामध्ये उपस्थित होती. राहुलच्या फलंदाजी दरम्यान ती टाळ्या वाजवून त्याला चीअर करून त्याला प्रोत्साहन देताना दिसली.
राहुलने या लढतीत १९ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. राहुलच्या प्रत्येक फटक्यावर आथिया खुश होत होती. सामन्या दरम्यानच्या तिच्या सर्व प्रतिक्रिया कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आल्या.
काल विराट कोहलीचा वाढदिवस होता त्याचप्रमाणे आथिया शेट्टी हिचा सुद्धा वाढदिवस होता. कालच्या वेगवान विजया नंतर केएल राहुल याने सोशल मीडियावर आथिया शेट्टी हिच्यासोबतचा खास फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्याचसोबत राहुल याने फोटोसोबत आथिया हिला वाढिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची मुलगी असून, बऱ्याच काळापासून केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्यामध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र या दोघांनीही अधिकृतरित्या आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. अनेकदा हे दोघे सोबत फिरताना दिसले होते. मात्र आता राहुलने केलेल्या वाढदिवसाच्या पोस्ट सोबत हार्टच्या स्टिकरसोबत आथियाचा फोटो शेअर केल्याने दोघांच्या प्रेमाला अधिकृतपणे दुजोराच दिला आहे.