रोजगार देण्याच्या नावाखाली भुलून लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार झाल्यावर आरजू टेक्सोल कंपनीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे. ‘सकाळ’ने महिन्याभरापूर्वी याची भांडाफोड केली होती. गुंतवणूकदार पुढे आले असून, आपली १८ लाखांची या कंपनीने फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद शशिकांत फडके (रा. गावखडी), संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनी ऊर्फ अमर महादेव जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी संशयित चार संचालकांची नावे आहेत.
ही घटना २०२१ ते २३ मे २०२४ या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी येथील आरजू टेक्सोल कंपनी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संशयित प्रसाद फडके, संजय सावंत, संजय केळकर आणि अनी ऊर्फ अमर जाधव यांनी आरजू टेक्सोल कंपनी या नावाने जून २०२१ मध्ये कंपनी स्थापन केली. २५ हजार ते ४० लाखांपर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या कंपनीच्या योजना होत्या. राजेश प्रभाकर पत्याने (वय ५२) यांना या योजनांबद्धल माहिती सांगून त्यांना खिळे बनविण्याचे अॅटोमॅटिक मशिन खिळे बनविण्याचा कच्चा माल, तसेच पुरविण्यात आलेला कच्चा माल तयार केल्यानंतर त्याबाबत मोबदला देतो, अशी आश्वासने दिली.
१६ टक्क्यांप्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतवा म्हणून देतो; तसेच १५ महिने झाल्यानंतर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत करतो व तसे कंपनीमार्फत अॅग्रिमेंट करून देतो, असेही आश्वासन दिले, आजपर्यंत राजेश पत्याने तसेच त्यांच्यासारख्या इतर गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक केली. नंतर जादा परतवा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांना कोणतीही रक्कम तसेच इतर मोबदला न देता एकमेकांच्या साह्याने आपली १८ लाख रूपयांची; तसेच इतर गुंतवणूकदाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी राजेश पत्याणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, कंपनीच्या संशयित चार संचालकांविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.