‘माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने मैत्री करून रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी असलेले नाते त्याने तोडले. दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिप सुरू केली. मुलीला टाळून तिचा मानसिक छळ केला. २९ जूनला ती रत्नागिरीत मित्राला भेटण्यासाठी आली होती. तिला न भेटता त्याने परत नाशिकला जाण्यास सांगून मानसिक त्रास दिल्याने तिने भगवती किल्ला शिवसृष्टी येथून उडी मारली. जसमिक सिंग याने तिला आत्महत्येस भाग पाडले’, अशी तक्रार बेपत्ता सुखप्रीत हिच्या वडिलांनी दिली. या तक्रारीवरून रत्नागिरीतील संशयित बँक अधिकारी जसमिक सिंग याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलीचे वडील प्रकाशसिंग हरनेकसिंग धालिवाल यांनी तक्रार दिली आहे. ‘माझी मुलगी सुखप्रीत (वय २५) २८ जूनपासून बेपत्ता झालेली आहे. त्याबाबत नाशिक पिंपळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. मुलगी रत्नागिरीत आलेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. सुखप्रित ही नाशिक येथे भाड्याने राहत होती. ती आयडीबीआय बँकेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत होती.
२७ जूनला फोनवर आमचे बोलणे झाले. दुसऱ्या दिवशी मी तिला पैसे आल्याचे सांगण्यासाठी फोन केला; मात्र तिचा फोन बंद होता. त्यानंतर दिवसभरात तिचा फोन बंदच होता. म्हणून मी नाशिक-पिंपळगाव येथे राहणारे. आमचे नातेवाईक यांना सुखप्रित हिच्याबाबत माहिती घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर, तिच्या रूमला लॉक होते. सुटी असल्याने सुखप्रित फिरायला गेलेली आहे. सोमवारी परत येणार असल्याचे आम्हाला समजले. ३० जूनला सकाळी ९ वा.च्या सुमारास सुखप्रित काम करत असलेल्या बँकेत चौकशी केली, तेव्हा ती बँकेत आलेली नसल्याचे समजले. म्हणून त्याने घरमालकाकडून चावी घेऊन सुखप्रित हिच्या रूमचे लॉक उघडले. तेव्हा त्यांना रूममध्ये बेडवर उशीच्या खाली एक सुसाइड नोट मिळाली. ती सुखप्रित हिनेच लिहिलेली असल्याचे वाचल्यानंतर समजले. त्यामध्ये तिने आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले होते, अशी हकिकत मनज्योतकडून समजली.
त्यानंतर सुखप्रितच्या शेजारी राहणारे रवी बिस्मावर सैनी यांनी पिंपळगाव पोलिस ठाणे (नाशिक) बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मी, माझा मुलगा व इतर नातेवाईक यांच्यासह पिंपळगावला १ जुलैला पोहोचलो. त्या ठिकाणी पोलिसांकडून आम्हाला सुखप्रित हिचे शेवटचे लोकेशन रत्नागिरी येथे असल्याचे समजले. त्यानंतर सुखप्रित हिच्या मैत्रिणीकडून आम्हाला तिचा रत्नागिरी येथे राहणारा मित्र जसमिक सिंग याच्याबाबत माहिती मिळाली. आम्ही जसमिक सिंग याच्या नंबरवर फोन करून मुलगी सुखप्रित हिच्याबाबत माहिती घेतली. त्याने रविवारी सकाळी सुखप्रित हिने अनोळखी नंबरवरून फोन केला होता, असे सांगितले. ती रत्नागिरी येथे आलेली आहे; मात्र मी बाहेर आहे, असे सांगून तिला परत नाशिक येथे जाण्यास सांगितले होते, असे जसमिक सिंग याने आम्हाला सांगितले. भगवती किल्ला येथून उडी मारून जीव देण्यासाठी माझ्या मुलीला भाग पाडले म्हणून माझी जसमिक केहर सिंग याच्याविरुद्ध तक्रार दिल्याचे’, वडिलांनी म्हटले आहे.