घटस्फोटीत इसमाला लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून त्यानंतर व्हॉटसअॅपद्वारे मुलगी असल्याचे भासवून चॅटींग करून तब्बल १ लाख ८३ हजार रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजापूर तालुक्यातील डोंगर येथील मुबीन फकीर कालू याच्याविरोधात राजापूर पोलीस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राजापूर पोलीसांनी पत्रकारांना दिली. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सज्जाद अब्दुल रेहमान मस्तान (५०, रा. डोंगर, मुसलमानवाडी) यांनी या संदर्भात राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. संज्जाद हे घटस्फोटीत असून पूनर्विवाहासाठी सन २०२२ साली ते वधूचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांची गावातील मुबीन फकीर कालू याच्याशी ओळख झाली. त्याने आपल्या ओळखीमध्ये एक मुलगी असून तिच्याशी आपण तुमच्या लग्नाची बोलणी करू असे सांगून संबंधित मुलीचा नंबर दिला. ही मुलगी बारामती या ठिकाणी राहत असून त्याठिकाणी जावून लग्नाची बोलणी करण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. त्यावेळी आपण त्याला १६ हजार रूपये दिले असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्या मुलीचे वडील आजारी असल्याचे कारण सांगून उपचारासाठी ३४ हजार रूपये घेतले.
तसेच मुलीचा नंबर असल्याचे भासवून मुबीन हाच व्हॉटसअॅपद्वारे सज्जाद यांच्याशी चॅटींग करत असे व नवीन ड्रेस व कपडे खरेदीकरीता वारंवार पैशाची मागणी करून गुगल पे व्दारे नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत तब्बल एक लाख ३३ हजार रूपये त्यांने उकळल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर सज्जाद यांनी मुबीन याला वारंवार संबंधित मुलीशी लग्नाची बोलणी करण्याबाबत विचारणा केली असता तो भूलथापा देवू लागला. त्यामुळे संशय आल्याने सज्जाद यांनी पोलीसात तक्रार करण्याचा ‘इशारा देऊन मुबीन याला घेवून बारामती गाठली. मात्र त्याठिकाणी मुबीन याने संबंधित मुलीशी भेट घालून न देता-उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच आतापर्यंत घेतलेले पैसे परत देतो असे सांगितले. मात्र मागील ३ वर्षापासून संशयीत आरोपी मुबीन कालू हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर सज्जाद यांनी राजापूर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणून मुबीन कालू याच्याविरोधात भा.दं.वि. कलम ४१९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करीत आहेत.