माघार घेता घेता मॉन्सूनने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिकांची हानी केली आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात पावसामुळे नष्ट झालेल्या पिकाचे क्षेत्र १८ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. देशातील परतीच्या पावसाच्या माघारीचा प्रवास यंदा २३ सप्टेंबरपासून सुरू झाला होता. सोमवारपासून (ता. १५) उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. मात्र राज्याच्या काही भागांत पुढील चार-पाच दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांमधील उभ्या पिकांची मोठी हानी झालेली आहे. साधारणपणे सोमवारी सायंकाळपर्यंत राज्यातील ३० हजार ५०० हेक्टरहून अधिक खरीप पिकांचे नुकसान झालेले होते.
परतीच्या पावसामुळे सर्वाधिक हानी नाशिक जिल्ह्यात झालेली आहे. आतापर्यंत मालेगाव, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील खरिपांच्या पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या तालुक्यांमधील २६ हजार ३४८ हेक्टरवरील मका, सोयाबीन, भात, भाजीपाला आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. सांगलीच्या तासगाव, मिरज भागांतील अडीच हजार हेक्टरवरील ज्वारी, मका, मूग, उडीद, सोयाबीन व भाजीपाल्याचे नुकसान झालेले आहे. ठाणे जिल्ह्यातील ४५१ हेक्टरवरील खरीप पिके तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यातील १२८० हेक्टरवरील भात व भाजीपाला पिके परतीच्या पावसाने मातीमोल झाली आहेत.
राज्यात यंदा १४४ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पेरा केला आहे. यात ५१ लाख हेक्टरवर सोयाबीन, तर ४० लाख हेक्टरवर कापूस आहे. याशिवाय साडेचौदा लाख हेक्टरवर भात आणि १० लाख हेक्टरवर ज्वारी उभी आहे. सध्या ११ लाख हेक्टरवर मका; तर १२ लाख हेक्टरवर तुरीचे पीक उभे आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्यास नुकसान वाढू शकते, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात यंदा मॉन्सूनमुळे हानी झालेल्या पिकाचे क्षेत्र १४ ऑक्टोबरपर्यंत १८ लाख ३३ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाने खरिपात सर्वाधिक नुकसान नांदेड व परभणी जिल्ह्यांचे झालेले आहे.
या जिल्ह्यांमधील अनुक्रमे ३.४४ लाख हेक्टर व ३.४० लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरातील २.१४ लाख हेक्टरवरील, तर जालना भागातील २.२० लाख हेक्टरवरील खरीप वाया गेला आहे. बुलडाण्याच्या मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद या तालुक्यांमधील दीड लाख हेक्टरहून जास्त खरीप पिके यंदा वाया गेली.