नारली पौर्णिमेला समुद्राला आलेले उधाण, त्यातून समुद्रामध्ये येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागला. अशा स्थितीमध्ये पर्ससीन नेटद्वारे सुरू होणाऱ्या मच्छीमाराच्या नव्या हंगामाला सामोरे जात आहे. मच्छीमाराला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य राज हवामान अन् वातावरण, त्याच्या जोडीला समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा करंट यांचा अंदाज घेत मच्छीमार बांधव हातामध्ये जाळी घेत समुद्रामध्ये झेपावण्यास सज्ज झाला आहे. त्यातून साखरीनाटे बंदरामध्ये नेहमी दिसणारा मच्छीमारांचा कोलाहल पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे.
तालुक्याच्या किनारपट्टीवर साखरीनाटे बंदर असून, दरदिवशी मच्छीमारीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या जिल्ह्यातील काही मोजक्या बंदरांमध्ये या बंदराचा समावेश होतो. या ठिकाणी सुमारे १९७०-७५ पर्ससीन नेट, दीडशे ते दोनशे फिशिंग ट्रॉलर, शंभर यांत्रिक होड्या.. सुमारे ५० बिगरयांत्रिक होड्या असे मिळून साडेतीनशे-पावणेचारशे मच्छीमार नौका मच्छीमारी करतात. मच्छीमार व्यवसायातून वर्षाला सुमारे शंभर कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल या बंदरामध्ये होते. या वर्षीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाले आहेत.
होड्यांवरील खलाशीही बंदरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खवळलेला समुद्र, अजस्त्र लाटा आणि वारा यामुळे मासेमारासाठी सद्यःस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आहे. समुद्रातील पाण्यालाही चांगलाच करंट आहे. या साऱ्या प्रतिकूल स्थितीचा अंदाज घेऊन पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे. या महिन्याच्या सुरवातीला नव्या हंगामाची झालेली सुरवात बंपर मासळीने झाली नसली तरी आश्वासक आरंभ राहिला आहे.