रत्नागिरीकर विविध कारणासाठी कायम चर्चेत असतात. मग त्यामध्ये एखाद्या खेळाचे प्रभुत्व असो, किंवा शोधपर निबंध असो. तर काही वेळा आपल्या छंद जोपासताना रत्नागिरी जिल्ह्यातील पाच सायकलस्वारांनी एसआर म्हणजेच सुपर रँडोनीअर हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील किताब पटकावला आहे. यामध्ये दापोली सायकलिंग क्लबचे मिलिंद खानविलकर, केतन पालवणकर आणि चिपळूण सायकलिंग क्लबचे श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले, अनंत बांदवडेकर यांचा समावेश आहे.
अडॉक्स क्लब पेरिसियन फ्रान्स आणि अडॉक्स इंडिया रँडोनीअर आयोजित २००, ३००, ४००, ६०० किमी अंतराच्या बीआरएम सायकलिंग स्पर्धा पार पडल्या. रँडोनीअरिंग म्हणजे एक प्रकारे स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग होय. बीआरएम हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे. विशेष म्हणजे धनश्री गोखले या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एसआर नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या महिला सायकलस्वार ठरल्या आहेत. तर श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले ही कोकणातील पहिली नवरा बायकोची एसआर जोडी ठरली आहे.
दापोलीतील मिलिंद खानविलकर आणि केतन पालवणकर हे तालुक्यातील पहिले एसआर झाले आहेत. या आव्हानात्मक खडतर स्पर्धेसाठी सर्वजण दोन वर्षांपासून जोमाने तयारी करत होते. यातील सर्वांनी आपली नोकरी, व्यवसाय, घर सांभाळत अनेक स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.
या सायकलस्वारांनी बीआरएम मध्ये २०० किमीचे अंतर झाराप बांदा कणकवली खारेपाटण झाराप, ३०० किमीचे अंतर वाशी नवी मुंबई महाड वाशी, ४०० किमीचे अंतर मुलुंड ठाणे चिखली गुजरात मुलुंड, ६०० किमीचे अंतर मीरा भाईंदर भरुच गुजरात मीरा भाईंदर या खडतर मार्गावर पूर्ण केले आहे. या यशाचे श्रेय सर्व सायकलस्वारांनी आपल्या कुटुंबाला आणि सहकारी सायकल मित्रांना दिले. शेवटी कोणतीही गोष्ट पूर्ण करायची तर त्याला जिद्द, सराव आणि चिकाटी असणे अतिशय गरजेचे आहे. आणि जर सोबत चांगली असेल तर कोणताही अडथळ्यांचा मार्ग सुकरच होतो.