शापूरजी-पालनजी उद्योग समूहाचे संचालक सायरस मिस्त्री यांचा ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू ओढवला. रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चारोटी गावच्या हद्दीत घोळ येथील सुर्या नदीच्या पुलावर मर्सिडिज कारचा अपघात झाला. या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी येथे झालेल्या अपघतात उद्योगपती सायरस मिस्त्रींचा मृत्यू झाला असून या अपघातात आता नवी माहिती समोर आली आहे. मिस्त्रींची कार एक महिला चालवत होती. तर अपघातात जीव गमावणारे सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल हे दोघे कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते.
अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार जण होते. कार अनायता पंडोल या चालवत होत्या. तर देरियल पंडोल हे त्यांच्या बाजूच्या सीटवर होते. तर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल हे दोघे मागच्या सीटवर बसले होते. हे चौघे गुजरात उधंवाडावरून मुंबईकडे जात असताना पुलावर हा अपघात झाला. घोळ येथील सुर्या नदी पुलावर चालकाचा अंदाज चुकल्याने पुलाच्या कठड्याला कार जोरदार धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रथमदर्शी वर्तवली आहे.
चारोटी उड्डाणपुलाच्या मुंबई बाजूकडील उतारावर तीन मार्गिका असताना काही मीटर अंतरावरच्या सुर्या नदीवरील पुल सुरु होण्याआधी डाव्या बाजूची एक मार्गिका कमी होऊन दोनच मार्गिका शिल्लक आहे. याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना सायरस मिस्त्री यांची कार सुर्या नदीच्या पुलाला धडकून झालेल्या अपघात घडला.