मुंबईतल्या दादरमधील बॅनरची चांगलीच चर्चा होते आहे. सोशल मीडियावरही हे बॅनर चांगलेच व्हायरल होत आहे. या बॅनरमध्ये राज ठाकरेंच्या दोन भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर तिसऱ्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ठेवण्यात आले असल्याचे दिसत आहे.
मुंबईतल्या दादर भागात लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये काल-आज आणि उद्या? असे तीन शब्द लिहिण्यात आले आहेत. काल या मथळ्याखाली राज ठाकरे यांचा मुस्लिम समाजाची टोपी घातलेला फोटो लावण्यात आला आहे. आज या मथळ्याला भगवा रंग देऊन त्यावर पांढऱ्या अक्षरात हनुमान असं लिहिण्यात आलं आहे. तर उद्या हा बॅनर पांढरा आहे, त्यावर काळ्या अक्षरात प्रश्नचिन्हं रेखाटण्यात आली आहेत.
राज ठाकरे हे कायम हिंदुत्ववादी प्रचार करताना दिसून आले परंतु, गुढीपाडव्याच्या सभेपासून सातत्याने आक्रमक होऊन भूमिका बदलतात आहेत, अशा प्रकारच्या या बॅनरने सुचविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या मागील दोन सभांमध्ये मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटत असतानाच आता दादरमध्ये लावलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या भूमिकेबद्दल अधिक आक्रमक झाल्यानंतर आता शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या दादरमध्ये राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आलीय. राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ईदचा म्हणजेच ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. आणि असे न झाल्यास मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दादरमध्ये राज ठाकरेंनी मुस्लिमांप्रमाणे टोपी घातलेला जुना फोटो असणारे बॅनर्स झळकले आहेत.