शहरालगतच्या खेडर्डी येथील साई प्रतिष्ठान व साई प्लाझा यांच्या वतीने महिलांसाठी विशेष दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. कोकणात महिलांसाठी ही पहिलीच दहीहंडी ठरणार आहे. मंगळवारी (ता. २७) पारंपरिक पद्धतीने पुरुषांसाठी बहादूरशेख नाका येथे दहीहंडी उत्सव होईल. सायंकाळी ४ वा. या उत्सवाला सुरुवात होईल. हंडी फोडणाऱ्या पथकास २५ हजार व चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच, सलामी देणाऱ्या पथकाला २ हजार ५०० रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक नितीन ठसाळे यांनी दिली.
या ठिकाणी मनोरंजनासाठी अभिषेक सुतार प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सप्तसुरांचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर लाईफकेअर हॉस्पिटलच्या सहकायनि आरोग्य तपासणी शिबिर होईल. या उत्सवादरम्यान प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ आयोजित केला आहे. सोन्याची नथ, पैठणी, गृहोपयोगी वस्तू अशी आकर्षक बक्षिसे आहेत. खास महिलांसाठी बुधवारी महिला विशेष दहीहंडीचे आयोजन केले आहे. बहादूरशेख नाका येथील साई प्लाझा याच ठिकाणी सायंकाळी पाच वाजता या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल. दहीहंडी फोडणाऱ्या महिला पथकाला १५ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच सलामी देणाऱ्या महिला पथकांना प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल.
या दिवशीही प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून, यासाठी खास १७ पैठणी जिंकण्याची महिलांना संधी मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी लोकप्रिय असणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार असून, वृषभ आकिवटे हे नामवंत निवेदक हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, पाच वर्षांखालील मुलांनी बालकृष्णाच्या वेशभूषेत यावयाचे आहे त्याचबरोबर करा ओके हा कार्यक्रम, लाईव्हलेझर लाईट शो दाखवला जाणार आहे. सामाजिक भान जपत मंडळाच्यावतीने वायरमन, पोलिस अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच महिलांचा सन्मानही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केवळ महिलांनाच उपस्थित राहता येणार आहे.