ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे दोन तासांहून अधिक काळ विजांचे तांडव सुरू होते. राजापूर तालुक्यातील तुळसुंदे, गोठणे-दोनिवडे आणि आंबोळगड येथे वीज कोसळून घराचे किरकोळ नुकसान झाले. सागवे परिसरात घरांचे छप्पर उडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी २०.७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड १२.५०, दापोली २२.५७, खेड १३.७१, गुहागर २०.६०, चिपळूण २५, संगमेश्वर १३.१६, रत्नागिरी २८.५५, लांजा २८.२०, राजापूर २२.२५ मि.मी. पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काल सायंकाळी रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. वेगवान वाऱ्यामुळे रत्नागिरी शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. राजापूर तालुक्यात मागील आठवड्यात अधूनमधून पाऊस पडत होता. मंगळवारी सकाळी दिवसभर राजापूरमध्ये कडकडीत ऊन होते. सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटामुळे घराबाहेर पडणेही धोकादायक होते. अनेक दुचाकीस्वारांना पावसात भिजतच घरी परतावे लागले.
सुमारे दीड-दोन तास पावसाच्या सरी कोसळल्या. तालुक्यात तीन ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या. गोठणे-दोनिवडे येथे ग्रामदेवतेच्या मंदिर परिसरातील झाडावर वीज कोसळली. ही घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामध्ये घराचे किरकोळ नुकसान झाले आहे. तुळसुंदे उगवतीवाडी येथे नरेश आंबेरकर यांच्या घरावर वीज पडून घराच्या भिंतीला भगदाड पडले. त्यात घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि वीजमीटर जळून नुकसान झाले आहे. आंबोळगड येथेही घरावर वीज कोसळून किरकोळ नुकसान झाले, तसेच सागवे-बुरंबे येथील ग्रामस्थांच्या घरांचे छप्पर उडून नुकसान झाले आहे.