मिरकरवाडा बंदरात उधाणाच्या भरतीचा आश्चर्यकारक तडाखा बसला आहे. मोठमोठ्या लाटा अडून त्यांची तीव्रता कमी व्हावी यासाठी ब्रेकवॉटर वॉल बांधण्यात आली आहे; परंतु काल या ब्रेकवॉटर वॉलच्यावरून अजस्त्र लाटा बंदराच्या दिशेने येत होत्या. एवढे मोठे उधाण होते. त्यामुळे या लाटांच्या माऱ्यामुळे जेटींवर उभ्या असलेल्या मच्छीमार नौका एकमेकांवर आदळून मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे, तर समुद्राचे पाणी प्रथमच जेटींच्या काठोकाठ आले असल्याचे मच्छीमार नेते सुहेल साखरकर यांनी सांगितले. अरबी समुद्राला आलेल्या भरतीचे आश्चर्यकारक परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी अनुभवण्यास मिळाले. मिरकरवाडा बंदर हे सर्वात मोठे बंदर म्हणून परिचित आहे. या ठिकाणी प्रथमच वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. पावसाळी मासेमारी बंदीमुळे सुमारे ३५० नौका वेगवेगळ्या नेटींवर शाकारून ठेवण्यात आल्या आहेत. समुद्राचे पाणी काठोकाठ भरलेले असल्याने या मच्छीमार नौकाही काठोकाठ दिसत होत्या. बंदरावरील नौकांना लाटांच्या माऱ्याने नुकसान होऊ नये यासाठी भगवती बंदर येथे ब्रेकवॉटर बॉल आहे.
मोठमोठ्या लाटा या ठिकाणी आदळून त्या लाटांच्या माऱ्याची तीव्रता कमी होते; परंतु कालच्या भरतीच्या उधाणात उसळलेल्या लाटा ब्रेकॉटर वॉल ओलांडून वेगाने बंदराच्या दिशेने येत होत्या. त्यामुळे दाटीवाटीने शाकारून ठेवलेल्या नौका एकमेकांवर आदळत होत्या. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरही त्याचे परिणाम झाले. मोठमोठ्या उसळलेल्या लाटांमुळे मंडणगड, दापोली येथील समुद्रकिनाऱ्याच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी उभ्या असलेल्या नौका वाहून जाण्याचेही घटना घडल्या आहेत. लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवलेल्या पागांच्या साखळ्या तुटून जाण्याचे प्रकारही घडले. मिरकरवाडा बंदरात हा असा प्रकार प्रथमच पाहावयास मिळाला, असे मच्छीमार नेते सुहेल साखरकर यांनी सांगितले.