मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण तुकड्यातुकड्यात सुरू असून, सध्या रत्नागिरीतील काम हातखंबा तिठ्यापर्यंत येऊन ठेपले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरी शहराकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने याच ठिकाणी जंक्शन तयार करण्यात येणार आहे; मात्र सध्या मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याहून मुंबईकडे तसेच रत्नागिरीतून ये-जा करणारी वाहने याच ठिकाणी येत असल्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. मिऱ्या-नागपूर महामार्ग होत असल्यामुळे हातखंबा तिठा परिसराचे रूपच पालटले आहे. या भागात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रिक्षाचालकांसह प्रवासी त्रस्त झालेले आहेत. या परिसरात रात्रीचा प्रवास करणेही धोकादायक ठरत आहे.
रात्री डोळे दीपवून टाकणाऱ्या हेडलाईटचा लख्ख प्रकाश आणि विरूद्ध दिशेने धावणारी वाहने काँक्रिटीकरणात रस्त्यांची उंची वाढली अपघाताला निमंत्रण देत आहेत तसेच आहे; मात्र जुने रस्ते जोडण्यासाठी मोठ्या खडीचा वापर करण्यात आलेला आहे. त्या मोठ्या खडीवरून वाहने चालवताना दुचाकीचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाहनचालकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणीही काळजी घेत नाही. याकडे महामार्ग प्राधिकरण विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला शिस्त राहिलेली नाही. त्यातून लहान-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
हातखंबा ते मिऱ्यादरम्यान महामार्गाचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी डायव्हर्जनचे फलकच नाहीत. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातामध्ये प्रवासीही दगावला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पाहणी करून ठिकठिकाणी रिफ्लेक्टर, वाहतूक सुरक्षापट्टी, सुरक्षाबोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. ठेकेदाराकडून त्या सूचनांचे पालनही केले गेले; परंतु खोदलेल्या सर्व्हिस रोडवरील पाण्याने टणक झालेल्या खड्ड्यांची स्थिती जैसे थे आहे. टणक झालेल्या खड्ड्यांनी वाहनचालकांना त्रास होत आहे. रोलर फिरवून ते खड्डे बुजवण्याची गरज आहे, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवासी करत आहेत.

