कोकणाला लाभलेले निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ घालत. त्यामुळे अनेक पर्यटक कुटुंब, मित्र मैत्रीणींसोबत पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे कोकणामध्ये विविध तालुक्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्थळे उपलब्ध आहेत. कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांच्यावतीने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना दापोली तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता निवेदन देण्यात आले आहे. दापोली तालुक्याला चहुबाजूनी निसर्गाच्या सौंदर्याला मोठे वरदान लाभले आहे.
हिरवागार डोंगर आणि दुसरीकडे निळाशार समुद्र, मासे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोलीकडे येतात. मुंबई व पुणे येथून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांमुळे तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावताना दिसत आहे. एकदा पर्यटक येऊन गेल्यावर, पुन्हा आपोआप त्याची पाऊले परत वळली पाहिजे अशा सोयी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. पर्यटकांची संख्या आणि मुक्काम वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन पातळीवर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने विकास होणे गरजेचे आहे.
यामध्ये , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे ही तीन भारतरत्ने तसेच कान्होजी आंग्रे, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभारल्यास तालुक्याची शोभा वाढण्यास मदत होईल.
दापोलीत जैवविविधता पार्कची गरज आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर दापोली कोकण कृषी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यात यावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारणे, तसेच शिवाजी महाराज व कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर कायमस्वरूपी होलोग्रफिक अथवा लेझर शो करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.जेणेकरून पर्यटन व्यवसायाला जोड व्यवसाय निर्माण होऊन आर्थिक कणा देखील मजबूत राहील.