दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येत नाही. एकमेकांच्या मेळाव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करणे सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या बिझी दिनक्रमाबाबत आणि त्यांच्या कमी तासांच्या झोपेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्याला बीकेसी मैदानावर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना काही नेते झोपेमुळे पेंगत असताना दिसून आले. त्या सोबतच मेळाव्या दरम्यान घडलेल्या काही घटनांबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत.
राजकीय पडसाद उमटत असताना आता बीकेसीच्या मेळाव्यानंतर युवा सेनेने शिंदे गटावर आणखी एक आरोप केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी व्यवस्था केली होती, त्या जागेत मद्यपान करून मोठ्या प्रमाणात बाटल्या फेकल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारे कचरा आणि दारुच्या बाटल्या फेकल्यानं आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या युवा सेनेनं केली आहे. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजूनही काही विषय समोर आल्याने शिंदे गटाच्या मेळाव्याचे हसू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री फक्त दोन-तीन तास झोपतात, असं विधान दीपक केसरकर यांनी नुकतंच केलं होतं. आता शिंदे हे खरोखरच असं करतात की नाही, या वादात आपण पडायला नको. पण यावर माहिती देणारे दीपक केसरकर मात्र १० च्या आधीच कुठेही झोपतात हे पाहायला मिळालं आहे. बीकेसीतील दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना दीपक केसरकर आणि शंभूराजे हे दोन्ही शिंदे समर्थक डुलक्याकडून झोपताना दिसले. त्याचे व्हिडिओ देखील माध्यमांवर समोर आले आहेत.