दाभोळ खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळत असतानाच गेल्या तीन दिवसांपासून खाडीत मृत आढळल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे. कोसळणाऱ्या पावसाचा फायदा उठवत ईटीपीसह लोटेतील काही कंपन्यानी सांडपाणी नाल्याव्दारे सोडले असल्याचा आरोप दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीने केला आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यानी तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यानी बुधवारी केतकी, करंबवणे येथे जाऊन पंचनामा करत पाण्याचे नमुनेही घेतले आहेत.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेऊन सीईटीपीने प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले, तर काही कंपन्यानी आपले सांडपाणी सीईटीपीला न पाठवता थेट नाल्यात सोडल्याने ते खाडीच्या पाण्यात येऊन मिसळले असल्या आरोप दाभोळखाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी केला. सध्या खाडीतील पाण्यावर तवंग असून पाण्यालाही उग्र वास येत आहे. पाण्यावर ठिकठिकाणी मासे तरंगताना दिसत असल्याच्या तक्रारी खाडीलगतच्या गावांतील मच्छीमारांतून समितीकडे येत आहेत.
यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीईटीपी व्यवस्थापन आणि एमआयडीसीकडे तक्रार केली आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मच्छीमारांमध्ये संतापाचा उद्रेक होईल असा इशारा जुवळे यांनी दिला आहे. यावेळी संघर्ष समितो उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, केतकी उपसरपंच रमेश जाधव, समितो खजिनदार विजय जाधव, नीलेश मिंडे, नितिन सैतवडेकर, मदन जाधव, कृष्णा जाधव, मुकुंद सैतवडेकर, ऋषिकेश मिंडे, महिला अध्यक्ष विशाखा सैतवडेकर, जितेंद्र जाधव, पंकज जाधव उपस्थित होते.
पाण्यात तडफडताना दिसले – बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय जीरापूरे, क्षेत्र अधिकारी सुशीलकुमार शिंदे यांनी केतकी येथे जाऊन खाडी पाहणी केली. यावेळी किनाऱ्यालगत लहान मासे समूहामध्ये अस्वस्थ स्थितीत पाण्यात तडफडताना दिसले. स्थानिकांच्या सांगण्यानुसार काही मासे मृत आढळून आले. मात्र पाण्याला ओहोटी असल्याने ते वाहून गेले आहेत. भोईवाडी जेटीजवळ पाण्याचे नमुनेही घेण्यात आले.