रत्नागिरी तालुक्यातील पाली पाथरट धाडवेवाडी येथे शुक्रवारी (ता. २३) बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याचा मृत्यू न्यूमोनिया आणि काविळीमुळे झाल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविला आहे. मात्र, धाडवेवाडी येथे काल सकाळी वृद्धेवर हल्ला करणारा आणि मृत बिबट्या वेगवेगळे असल्याचे वन विभागाने सांगितले. त्यामुळे धाडवेवाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि पाली परिमंडळ वन कार्यालयातून मिळालेली माहितीनुसार पाली-पाथरट धाडवेवाडी येथील इंदिरा धाडवे यांच्यावर गुरुवारी (ता. २२) हल्ला झालेल्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर मृत बिबट्या आढळला.
बिबट्याचे वय दीड वर्षे आहे. बिबट्याचे सर्व अवयव जागेवरच असल्याचे तपासणीमधून पुढे आले. बिबट्याचा चार ते पाच दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला असावा असे सांगण्यात आले. त्याच्या शरीराचा काही भाग सडलेला होता. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच त्याचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती पाथरट पोलिसपाटील यांनी वनविभागाला दिली.
त्यानंतर सहाय्यक वनरक्षक रत्नागिरी प्रियांका लगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनअधिकारी प्रकाश सुतार, पाली वनरक्षक प्रभू साबणे, मिताल कुबल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. या वेळी पाथरट पोलिसपाटील प्रकाश गराटे, उपसरपंच संतोष धाडवे व ग्रामस्थ उपस्थित होते. त्या मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. दरम्यान, पाथरट परिसरात गेले काही महिने बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.