तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप व्यक्तींना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसुन जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेशी संबंधित वायरमन विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महावितरण कंपनीने वायरमन आणि शाखा अभियंत्याला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. निवळी येथे १७ जुलै २०२५ ला सायंकाळी ही घटना घडली होती. या प्रकरणी भोके येथील वायरमन दिलीप भिकाजी मायंगडे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, संशयित आरोपी वायरमन दिलीप मायंगडे यांनी विजेच्या खांबावरील तुटलेली तार दुरुस्त न करता तिचा विद्युत प्रवाह तसाच चालू ठेवला होता.
विशेष म्हणजे, झाडे तोडण्यासाठी ते स्वतः घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्याऐवजी, त्यांनी तक्रादार यांची बहीण विदुलता वासुदेव वाडकर आणि चंद्रकांत यशवंत तांबे यांना झाडे तोडण्यास सांगितले. झाडे तोडत असताना, या दोघांना तुटलेल्या तारेचा जोरदार धक्का लागला आणि दोघांचाहीं जागीच मृत्यू झाला. शांता वासुदेव वाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्युत विभागाच्या सुरक्षेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा. अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान महावितरण कंपनीला रत्नागिरी विद्युत निरीक्षण विभागाने अहवाल दिला आहे. यामध्ये देखभाल, दुरूस्तीचा अभाव, विद्युत वाहक तुटल्याने तार मार्गास स्पेसर्स, गार्ड लूप न बसविल्याने, उपरी तार मार्गालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी न केल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमि क अहवाल आहे. या अहवालामध्ये या अपघाताला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.