रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवार दि. २१ डिसेंबर रोजी होणार आहे. ३२ जागांसाठी १०१ उमेदवार रिंगणात आहेत तर थेट नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार उभे आहेत. दुपारी १ वा.पर्यंत चित्र स्पष्ट होईल असे अंदाज आहेत. कोण बाजी मारणार याबाबत उलट सुलट अंदाज वर्तवले जात असून सर्वांनीच विजयाचे दावेही केले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबरला झाली. आता मतमोजणी २१ डिसेंबरला होत आहे. शहरातील ६४ हजार ७४६ पैकी ३५ हजार ७५४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. नगराध्यक्षपदाची प्रमुख लढत महायुती विरुध्द उबाठा अशी होणार असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिल्याने महायुतीत मतविभागणी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचा फायदा कोणाला होणार? याचीही चर्चा सुरु आहे.
सकाळी १० वाजता रत्नागिरी नगर परिषदेच्या संत गाडेगबाबा सभागृहात मतमोजणी सुरु होईल. यासाठी १६ टेबल मांडण्यात येतील. प्रत्येक प्रभागातील एक केंद्र याप्रमाणे मतमोजणी होईल. सर्वात कमी केंद्र असणाऱ्या ठिकाणी लवकर निकाल जाहीर होईल. नगरसेवकांसाठी मतम ोजणी होताना नगराध्यक्षपदासाठीचीही मतमोजणी होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. यासाठी यंत्रणा सज्ज आहे. रत्नागिरीत दाखल झालेले पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे निवडून येणार असा दावा केला आहे. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचे दावे केले असून आपणच गुलाल उधळणार असेही म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर निकाल काय लागणार याकडे सर्वच. रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

