बेकायदेशीर सावकारीचे अनेक गंभीर प्रकार आता पुढे येऊ लागले आहेत. सर्वसामान्य गरजूंना लुटण्याचा आरोप असलेले संशयित सावकार नीलेश कीर यांनी कर्जदारांकडून घेतलेले बॉण्ड, गाड्यांची कागदपत्रे गायब केली आहेत. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये अनेक कर्जदारांच्या कागदपत्राच्या फोटोकॉपी असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’ पोलिसांना आढळून आल्या आहेत. त्यांचा संबंध कर्जदारांशी आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता आहे.
नीलेश कीरला सहा दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळाली असून पोलिसांना तपासात खोलवर जाण्याची संधी मिळाली आहे. चार दिवसांपूर्वी मिऱ्या येथील नीलशे कीर याला शहर पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी प्रकरणी ताब्यात घेतले. पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर आता तक्रारदारांचा ओघ शहर पोलिस ठाण्यात वाढला आहे. आतापर्यंत आठ कर्जदारांनी आपली पिळवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली असून त्यांना पहिल्या गुन्ह्यात पोलिसांनी साक्षीदार म्हणून नोंदविले आहे. सावकारीचा पहिला गुन्हा रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर नीलेश कीर सावध झाला होता.
आपल्यावर कारवाई होणार हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपल्याकडील कर्जदारांकडून घेतलेली सर्व कागदपत्रे गायब केली. कागदपत्रे गहाळ झाल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. मात्र काही कागदपत्राच्या फोटोकॉपी पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्या आहेत. कर्जदारांशी ज्या भाषेत तो दमदाटी, शिवीगाळ करत होता, असा आरोप आहे त्याच्या ऑडिओ क्लिप त्यानेच रेकॉर्डिंग करून ठेवल्या आहेत. त्या पोलिसांना मिळाल्या आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह “व्हिडिओ क्लिप” आहेत. त्याचा या गुन्ह्याशी काही संबध आहे का? याचा शोध पोलिस घेत आहे. नीलेश कीर याचा मोबाईल पोलिसांसाठी मुख्य पुरवा ठरणार आहे.