छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या प्लॅटफॉर्म दुरुस्तीमुळे मांडवी, कोकणकन्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पनवेलपर्यंत थांबा दिल्याने व या ट्रेन ४ ते ५ तास उशिरा येत असल्याने चाकरमामान्यांचे अंतोनात हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया. ऐकायला मिळत आहेत. सीएसटी रेल्वे स्टेशनच्या १० आणि ११ नंबर फ्लॅटफॉर्मच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन मे महिन्याच्या सुट्टीत चाकरमानी रजा संपवून मुंबईकडे निघाल्याने ट्रेनना गर्दी आहे.
अशावेळी मध्य रेल्वेने दुरुस्तीचे कारण दाखवत कोकण रेल्वेच्या काही ट्रेनना मुंबईतील इतर स्टेशनवरं थांबा न देता मांडवी, कोकणकन्या इत्यादी ट्रेनना पनवेलपर्यंत थांबा दिल्याने त्याचा प्रचंड रास प्रवाशांना होऊ लागला आहे. मांडवी ट्रेन ४-५ तास लेट प्रवाशांनी बोलताना सांगितले, मांडवी ट्रेन पनवेल येथे येण्याची नेहमीची वेळ ही सायंकाळी ७.३० ची आहे. पण आता त्या वेळेला ती आणली जात नाही. वाटेत राखडपट्टी केली जाते. कोकणकन्या सुटण्याची जी वेळ रात्री ११ वा.च्या सुमारास आहे. त्यावेळी बरोबर आणली जाते. याचा त्रास प्रवाशांना होतो.
या दरम्यान रेल्वेकडून ट्रेनला उशीर होत आहे. किती वाजता पनवेलला पोचणार? याबाबत कोणत्याही सूचनेने संदेश पाठविण्याचे सौजन्य रेल्वे कडून दाखविले जात नाही. इंटरनेट स्टेटस पुढे चुकीचा दाखविला जातो. रात्री ११ वा. च्या दरम्यान पनवेल स्टेशनवर मांडवी ट्रेन पोचते. ती नंतर कोकणकन्या म्हणून सोडली जाते. गुरुवारी आलेली मांडवी ट्रेन तशीच आणली गेली. त्यामुळे मांडवी ४-५ तास उशिरा पोहोचली, असं प्रवाशांनी सांगितले.
मुंबईकडे यायला भुर्दंड – पुढे त्यांनी सांगितले, गेले काही दिवस हा प्रकार सुरु असून आतापर्यंत पोचलेले प्रवाशी त्रास सहन करीत मुंबईला पोचले आहेत. त्यांच्यासोबत म्हातारी कोतारी माणसे आणि मुलेबाळे यांचीही दमछाक होत असते. मांडवी ट्रेन रात्री उशिरा पनवेल येथे पोचल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना शेवटची लोकल मिळत नाही. या कालावधीत आंबे, फणस या गावची भेट बांधून घेऊन चाकरमानी येत असतात. वजनदार सामान उचलताना जिने चढताना त्रास होत असतो. रात्री मुंबईकडे येणाऱ्या चाकरमाऱ्यांना ८०० रुपये टॅक्सिचे भाडे मोजावे लागते. हा भुर्दंड चाकरमान्यांना सोसावा लागतो. रात्री १.३० ते २ वाजेपर्यंत थकून दमून चाकरमानी आपल्या घरो पोचतात, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
कोकणी माणसांबद्दल दुजाभाव का? – परराज्यातून येणाऱ्या ट्रेनना सीएसटी स्टेशनवर थांबा मिळतो? पण कोकणातून येणाऱ्या ट्रेनना का नाही? कोकणी माणसांबद्दल दुजभाव का? असा सवाल होत आहे. मे महिन्याची अखेर आहे. गावी गेलेले लोक मोठ्या संख्येने परतू लागले आहेत. मग त्याच वेळेला मध्य रेल्वेने फ्लॅटफॉर्म दुरुस्तीचे काम कसे काय काढलं? नंतरची वेळ नव्हती का? असा सवाल व्यक्त होत आहे. तसेच ठाणे, दिवा, कुर्ला टर्मिनस इत्यादी स्टेशनवर या ट्रेनच्या थांब्यांची व्यवस्था मध्य रेल्वेने का केली नाही? असे सवाल प्रवासी उपस्थित करीत असून मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी ऐकायला मिळत आहे.