घनकचरा प्रकल्प व विकास आराखड्यावरून लांजा नगरपंचायतीभोवती सध्या वादाचा फेरा सुरू झाला असतानाच आता कुवे गावाने घेतलेल्या निर्णयामुळे नव्याने संघर्ष उभा राहण्याची शक्यता दिसते आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातून कुवे गावाला वगळण्यात यावे अशी मागणी कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीच्यावतीने मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या कुवे गावातील नागरीकांनी यापूर्वी कृती आराखडा व डंपिंग ग्राऊंडवरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे पहायला मिळाले होते. नगरपंचायतीकडे बोट दाखवत कुवे गावासाठी नगरपंचायतच नको असे स्पष्ट संकेत कुवे गावच्या ग्रामस्थांनी दिले आहेत. मंत्री ना. नितेश राणे यांना दिलेल्या एका निवेदनात कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीने म्हटले आहे की, दि. ६ ऑक्टोबर २०१२ रोजी महाराष्ट्र शासनाने लांजा नगरपंचायतीची रचना केली. लांजा शहर अर्थात लांजा तालुका ठिकाणाबरोबर कुवे व गवाणे या दोन ग्रामपंचायतींचा समावेश लांजा नगरपंचायतीमध्ये करण्यात आला.
त्यानंतरच्या काळात गवांणे या ग्रामपंचायत क्षेत्राला लांजा नगरपंचायतीमधून वगळण्यात आले. मात्र यावेळी कुवे ग्रामपंचायत क्षेत्राचा विचार करण्यात आला नाही. कुवे गाव लांजा नगरपंचायतीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. गावातील रहिवासी सर्वसामान्य शेतकरी असून त्यांचा मुख्य व्यबसाय शेती व मोलमजूरी आहे. येथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून गावातील बहुसंख्य ग्रामस्थ सर्वसामान्याचे जीवन जगत आहेत. लांजा नगरपंचायतीमध्ये कुवे गाव समाविष्ट झाल्यापासून गावाचा विकास योग्यरित्या झाला नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास नगरपंचायतीतून बसणारा विविध प्रकारचा कर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तसेच लांजा ते कुवे या ५ किमी अंतराचा विचार केल्यास क्षुल्लक कामांसाठी लांजा येथे जाणे-येणे आर्थिक व वेळेची गैरसोय होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासह कुवे ग्रामपंचायतीमध्ये ५० एकर वनक्षेत्र असून ७० एकर जागा लघु पाटबंधारेच्या तलावामध्ये गेली आहे. त्यामुळे गावाचे क्षेत्र आधीच कमी झाले आहे.
कुवे गावाची २०११ च्या जनगणनेनुसार २ हजार ६३ लोकसंख्या आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार तालुका ठिकाणच्या गावाची नगरपंचायत जाहीर करण्यात आली. मात्र २०११ ची लोकसंख्या पाहता लांजा शहराची लोकसंख्या वाढली असून सध्या लांजा शहर लोकसंख्येने परिपूर्ण शहर झाले आहे. नगरपंचायत निर्माण करताना लांजा शहराला लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी तत्कालीन कुवे गावाचा आधार घ्यावा लागला होता. मात्र सध्या लांजा शहराचा लोकसंख्येचा निकष पूर्ण झाला असल्याने कुवे गावाला लांजा नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे, अशी मागणी कुवे ग्रामपंचायत संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. मत्स्य व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांना निवेदन देताना अशोक गुरव, दीनानाथ सुर्वे, कृष्णा निवळे, केशव गुरव, कमलाकर गोरे, चंद्रकांत नेमण, मदन राडये, सिद्धेश नेमण, चंद्रकांत वाडकर, मोहन नेमण, गणपत सावंत, सचिन खानविलकर, महेश सुर्वे, संतोष दुडये, सचिन वारेशी उपस्थित होते.