शासनाच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून २०१८ पासून शिल्लक राहिलेल्या स्वयंचलित तीन चाकी सायकलची (साईड व्हीलसह स्कूटर) यादी प्रलंबित आहे. त्याकरिता तत्काळ निधी देऊन वाहने दिव्यांग बांधवांना द्यावी, अशी मागणी जिल्हा एकता दिव्यांग ग्रुपने आज केली. या ग्रुपने आज जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह पालकमंत्री यांना निवेदन दिले. सर्व दिव्यांगांनी २०१८ पासून स्वयंचलित तीन चाकी सायकल (साईड व्हीलसह स्कूटर) साठी अर्ज केले होते. मात्र त्यातील अर्धेच दिव्यांगांना गाडीसाठी निधी मिळाला. त्यातही काही आता आलेले अर्ज होते. या निधीचे समान वाटप न झाल्यामुळे रत्नागिरी तालुक्याला जास्त निधी व अन्य तालुक्यांना कमी निधी मिळाला आहे. आताच्या ५ टक्के दिव्यांग निधीमध्ये आम्ही व अन्य दिव्यांग शिल्लक राहिले आहोत.
त्यांना त्यांच्या क्रमवारीप्रमाणेच निधी वाटप केला जावा. प्रथम यादीतील नावे पूर्ण झाल्यानंतर नवीन नावांचा विचार करावा. दिव्यांगांची शिल्लक राहिलेली यादीची लवकरात लवकर पूर्तता करून त्यासाठी निधी वितरित केला जावा, अशी मागणी केली आहे. निधी उपलब्ध करून दिव्यांगांची शिल्लक राहिलेल्या यादीची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी मागणीही या दिव्यांगांनी केली आहे. हे निवेदन देण्यासाठी संगमेश्वरमधून शांताराम लाड, अमित देसाई, दीपक जाधव, रवींद्र कुळ्ये, चिपळुणमधून आतिष सकपाळ, खेडचे चंद्रकांत आंब्रे, महेश भोसले, राजापूरचे सनिफ हातवडकर सदाकत घालवेलकर, तबरेज भाटकर अंकिता गांधी, रमेश डोंगरकर, संतो धरणकर आदी उपस्थित होते.