चिपळूण व खेडसाठी स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून ‘कोरे’ कडून दुर्लक्षित होत आहे, परिणामी चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना व कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा आशयाचे निवेदन जल फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव व सहकाऱ्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांना नुकतेच पाठविले आहे.
चिपळूण व खेडसाठी स्वतंत्र गाडी नसल्यामुळे लांब पल्लूयाच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. तर गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येतं नाही. काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. गणेशोत्सवात तर हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. तिकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे.
परंतु खेड, चिपळूणचे मुंबईपासूनचे अंतर रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या तुलनेत कमी असल्यामुळे व पनवेल किंवा दिवा याठिकाणी पोहोचणे त्रासदायक असल्यामुळे अति गर्दीचे दिवस वगळता प्रवासी त्या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नसतात. हेच लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणीही जल फाउंडेशनने केली आहे. मागील काही वर्षांत खेड, माणगाव, रोहा येथे अति गर्दीमुळे प्रवाशांमध्ये झालेले वाद, गाडीवर दगडफेक यांसारखे प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.