राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या बेधडक आणि स्पष्टपणाबद्दल सर्वज्ञात आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
परंतु, आपल्या बेधडक बोलण्याच्या स्वभावामुळे अजित पवार यांनी अखेर नाराजगी बोलून दाखवली. कार्यक्रमातील निवेदिकेच्या वारंवार सूचनांमुळे अजित पवार यांसह सर्वच उपस्थित मंत्र्यांना सारखे खुर्चीवरुन उठ-बस करावी लागली. त्यामुळे याबाबत अजित पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किलपणे पण आपली नाराजी व्यक्त केली.
याबद्दल ते म्हणाले, सुरुवातीपासून मी बारकाईने निरीक्षण करतो आहे, निवेदिकेने एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांना उठा- बसा करायला लावलं. मुख्यमंत्री उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रत्येक वेळेला उठावं लागत होतं आणि परत बसावं लागत होतं. एकदाचं सांगितलं असतं तर सर्व संपल असत. पण माईक तुमच्या हातात असल्यामुळे, आम्हाला काही बोलता आले नाही. अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही,” असे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले कि, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आजचा पर्यटन दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर्सनी राज्यातील पर्यटनाचे उत्कृष्ट फोटो काढले. ते फोटो बघून महाराष्ट्रात खरच अजून खूप काही पहायचे आहे, याची माहिती मिळाली.
सर्वांचीच फोटोग्राफी एवढी सुंदर आहे की, बोलायला शब्द पुरत नाहीत. जे चांगलं आहे त्याचं महाराष्ट्र नेहमीच कौतुक करत आला आहे. या दिनाच्या निमित्ताने राज्यात मास्टरशेफ कार्यक्रम पार पडला, यातील विजेत्यांना पारितोषके देण्यात आली; परंतु, त्यांनी बनवलेल्या पदार्थांची थोडी तरी चव घ्यायला मिळाली असती तर आम्हाला सुद्धा बरं वाटलं असतं, अशी मजेमध्ये अजित पवार म्हणाले.