चिपळूण धामणवणे-खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ट्रॅव्हल एजंट जयेश गोंधळेकर याने पळवून नेलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर, संगणकातील हार्ड डिस्क आरवलीच्या नदीत टाकून दिली होती. या खूनप्रकरणी जयेशला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने याची माहिती देताच शोधाअंती पोलिसांनी या नदीतील या दोन्ही गोष्ट मिळवल्या. जोशी यांच्याखुनाचे गूढ उकलणे पोलिसांसमोर आव्हान असताना या खुनावेळी घरातील अस्ताव्यस्त कागदपत्रामध्ये एका एस.टी. तिकीटावर असलेले नाव, नंबर हाच धागा पकडून पोलिसांनी जयेश याचा शोध लावला. शहरालगच्या धामणवणे-खोतवाडी येथील प्राथमिक शाळेच्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा हात-पाय बांधून निघृणपणे खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. खनावळी मारेकऱ्यांनी त्याच्याघरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.
यात काही कागदपत्रांचा समावेश होता. शिवाय घरातील डीव्हीआर तसेच हार्डडिस्क देखील मारेकऱ्याने पळवून नेले होते. जोशी यांच्या खुनाच्या तपासकामी पोलिसांची ५ पथके कार्यरत होती. याद्वारे तपास गतिमान करत अखेर ट्रॅव्हल एजंट जयेश गोंधळेकरं याला पोलिसांनी अटक केली. पुरावा नष्ट करण्यासाठी जयेशने पळवून नेलेला डीव्हीआर, हार्डडिस्क मुंबई-गोवा महामार्गावरील आरवलीनदीच्या पुलावरून नदीत फेकली होती. चौकशीअंती त्याने ही माहिती दिल्यानुसार पोलिसांनी नदीत शोध घेऊन त्या दोन्ही गोष्टी शोधून काढल्या. पोलिसांच्यादृष्टीने डीव्हीआर तसेच हार्ड डिस्क हा खुनाचा भक्कम पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. जोशी या पर्यटनासाठी अनेक ठिकाणी जात होत्या. यासाठी ट्रॅव्हल एजंट जयेश त्यांना मदत करत असे. हाच धागा पकडून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.