काळ्या जादूवर लोकांचा आजही विश्वास असल्याचे एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील सहाजणांच्या मुसक्या रायगड पोलिसांनी आवळल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई गावात हा प्रकार घडला. संतोष मारुती पालांडे (रा. कुवारबाव, एमआयडीसी रत्नागिरी), प्रदीप पांडुरंग पवार (रा. कळंबस्ते, ता. खेड), प्रवीण अनाजी खांबल (रा. नाचणेरोड, रत्नागिरी), सचिन अशोक सावंतदेसाई (रा. खेडशी), दीपक दत्ताराम कदम (कुवारबाव), मिलिंद रमेश साळवी (रा. स्वामी छाया संकूल, चिपळूण), राजेंद्र सुधाकर तेलंगे (रा. हेटवणे, सध्या रा. कोलाड ) व अन्य दोन अनोळखी असे संशयित आहेत. रोहा पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा तालुक्यातील धामणसईतील बौद्धवाडी शेजारील स्मशानभूमीत रविवारी देवदेवस्की सुरू असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली होती. या ठिकाणी काही ग्रामस्थांना फुले आणि अबीर-गुलाल, लिंबू, टाचण्यांचा वापर करत केलेली पूजा दिसली. काही तरी अघोरी विद्येचा प्रकार असल्याचा संशयही ग्रामस्थांना आला. रत्नागिरी, चिपळूण, खेड येथील संशयित धाम णसई स्मशानभूमीत तसेच खासगी शाळेत अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा यासारखे कृत्य करण्याच्या उद्देशाने पूजाअर्चा करत असताना रोहा गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. बघता तत्काळ तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयितांना रंगेहाथ पकडले. दरम्यान संतप्त जमावाने त्याना चोप दिला. या प्रकारची माहिती तेथील ग्रामस्थांनी लागलीच पोलिसांना दिली होती. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.