लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची बैठक झाली. टाऊन प्लॅनर, मुख्याधिकारी, इंजिनिअर आदी उपस्थित होते. हा विकास आराखडा रद्द होणार नाही; परंतु यामध्ये जे काही बदल असतील ते नक्की करू. काल काही लोक मंत्री नीतेश राणे यांना भेटले. ते देखील माझ्या मताप्रमाणे असतील. लोकांना आवश्यक तो बदल आराखड्यात करू, त्यामुळे तो रद्द करण्याची वेळ येणार नाही. आराखड्यात कोणाचेही नुकसान होणार नाही, कोणाची जागा फुकट घेतली जाणार नाही. ज्या सुधारणा असतील त्या करू काही लोकांना राजकारण करायचे आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार किरण सामंत यांनी मांडली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते. लांजा शहरविकास आराखड्याला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे. काही लोकांचा या आराखड्याला पाठिंबाही आहे; परंतु यावरून राजकारण सुरू आहे.
याबद्दल आमदार किरण सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, शहराच्या विकासासाठी हा विकास आराखडा आहे. त्यामुळे तो रद्द होणार नाही. काहीजण यात राजकारण करत आहेत. काहींनी आंदोलनही केले, काही मंडळी भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनाही भेटले. आपणही नितेश राणे यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचीही भूमिका आराखडा नको अशी नसेल. या आरखड्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही. फुकट जागा कुणाची घेतली जाणार नाही. त्याचा योग्य मोबदला दिला जाईल. हा आराखडा मागील दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध होणे आवश्यक होते; मात्र तो झाला नाही; मात्र हा आराखडा झाल्यास लांज्याच्या भविष्यातील विकासाला महत्त्वाची दिशा देणारा असेल, असेही त्यांनी सांगितले.
पाणी, शाळा, आरोग्य, वीज आणि औद्योगीकरण हे आपले मतदार संघातील विकासाचे टार्गेट आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी कबूल केले आहे की, लांजा-राजापूरसाठी काहीतरी स्पेशल देऊ त्या दृष्टीने लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची भूमिका किरण सामंत यांनी सांगितले.