रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस यांच्यामध्ये कायमच चढाओढ सुरु असते. अजून आंब्याच्या मोसमाला साधारण दोन ते तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुंभारमाठ येथून देवगड हापूसची आंब्याची पेटी पुण्याला रवाना झाली आहे. शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी स्वत:च्या बागेतील ही पहिली देवगड हापूसची पेटी पुण्याला विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविली आहे.
सिंधुदुर्गमधील प्रगतशील शेतकरी म्हणून उत्तम फोंडेकर यांचे नाव प्रसिद्ध आहे. फोंडेकर यांनी बागेत जूनच्या शेवटच्या आठवड्यात आलेला मोहोर पाऊस आणि उन्हापासून जतन करून, टिकवून ठेवून त्यावर फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया केली. या हंगामातील पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी मिळवला असून, याआधीही कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान तिसऱ्यांदा फोंडेकर यांनी मिळविला आहे. त्यांनी दोन पाच-पाच डझनच्या पेट्या विक्रीला पाठविल्या होत्या, त्याची प्रतिपेटी १८ हजार रुपयाला विक्री झाली आहे.
देवगड हापूसच्या चवीला देश विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आंब्याच्या हंगामामध्ये चांगल्या प्रतीच्या आणि टिकावू फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वर्षीच्या हंगामातील प्रसिध्द देवगड हापूसची फोंडेकर यांच्या बागेतील आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल झाली असून, हि पेटी आंब्याचा मौसमाच्या दोन- तीन महिने आधीच बाजारपेठेत दाखल झाल्याने, त्या पेटीचे मुल्यांकन देखील चांगल्या प्रकारे झाले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा २५ दिवस आधीच हापूस आंब्याची पेटी बाजारपेठेमध्ये विक्रीस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्याला बाजारभाव सुद्धा साजेसाच मिळाला आहे. हळू हळू आता आंब्यांचे विविध प्रकार बाजारपेठेमध्ये दाखल होऊ लागतील.