जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता झाली. पुढल्या वर्षी लवकर या, अशी साद घालत बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी विसर्जनस्थळी भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. गुरूवारी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची देखील सांगता झाली. भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच २७ ऑगस्टला वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. दुपारी २१ मोदकांचा प्रसाद बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी २८ ऑगस्टला दीड दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली. भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. जिल्ह्यातील १३ हजार ८४४ घरगुती व ७ सार्वजनिक गणपतींच्या मूर्तीचे समुद्र, नदीत विसर्जन करण्यात आले. किनाऱ्यावर गर्दी होऊ नये आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसदलातर्फे ग्रामीण व शहरी भागात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात काल गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर १ लाख ६९ हजार ४१७ घरगुती गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना झाली. गणेशाची भक्तीभावाने आराधना केल्यानंतर गुरूवारी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. घराघरामध्ये मंगलमय वातावरण पहायला मिळत होते. लांजा, राजापूरसह चिपळूण, खेड परिसरात सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस होता. मात्र दुपारी पावसाने उसंत घेतली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला सुरवातही झाली. दीड दिवसाच्या विसर्जनालाही चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रत्नागिरीतील मांडवी, भाट्ये किनारी एक हजारहून अधिक गणरायाला निरोप देण्यात आला. बहूसंख्य गणेशभक्त चारचाकी गाड्यांमधून गणेशमुर्ती घेऊन येत होते. विसर्जन मिरवणुकांनी मांडवी किनाऱ्यावर गणेशभक्तांची गर्दी होती. किनाऱ्यावर गणपतीच्या आरत्यांच्या सूरांसह भक्तांचा ऊर भुरून आलेला दिसत होता.