एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत ३४ वर्षानंतर प्रथमच शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह हद्दपार झाले आहे. राज्यस्तरावर महायुतीमध्ये झालेल्या जागा वाटपात चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेली आहे. शिवसेनेने १९८९ ला बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली. १९९०च्या निवडणुकीत बापूसाहेब खेडेकर चिपळूणमधून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडून येणारे पहिले आमदार ठरले. १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेचे नेते भास्कर जाधव ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर चिपळूणमधून विधानसभेवर निवडून गेले. २००४ मध्ये भास्कर जाधव यांना डावलून मुंबई महानगरपालिकेतील तत्कालीन सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली तेव्हा भास्कर जाधव यांच्यासह मतदारसंघातील शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले.
शिंदे यांनी साडेपाच हजार मते मिळवून चिपळूणमध्ये धनुष्यबाणाचे अस्तित्व कायम ठेवले तेव्हा चिपळूणमधून राष्ट्रवादीचे रमेश कदम निवडून आले होते. चिपळूणची जागा राष्ट्रवादीला पहिल्यांदा मिळाली. २००४ नंतर चिपळूणमधील शिवसेनेचे अस्तित्व नगण्य होते. सदानंद चव्हाण यांनी पक्षाची धुरा हाती घेत अतिशय कष्टाने संघटना उभी केली आणि २००९च्या विधानसभा निवडणुकीत ते धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. २०१४ मध्येही ते ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर पुन्हा आमदार झाले; मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे शेखर निकम निवडून आले. २०१९ मध्ये राज्यात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. सुरुवातीला सदानंद चव्हाण महाविकास आघाडीचे घटक होते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.
२०२४ मध्ये भाजपच्या मदतीने धनुष्यबाण या चिन्हावर सदानंद चव्हाण विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते; मात्र शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चिपळूणचे आमदार शेखर निकमही शरद पवारांना सोडून भाजपसह सत्तेत सामील झाले. महायुतीने बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे चिपळूणमधून ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सदानंद चव्हाण यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे १९९० ते २०२४ या ३४ वर्षांत झालेल्या सात विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह होते; मात्र यावर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच चिपळूणमधील मतदान यंत्रावर शिवसेनेची ‘धनुष्यबाण’ ही निशाणी नसणार आहे.
आमदार नसेल तर शिवसेना कशी वाढणार ? – माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सरकारचे महामंडळ किंवा चिपळूणमधून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यांना पक्षाच्या उपनेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला तर सदानंद चव्हाण मतदारसंघात शिवसेनेचे संघटन कसे वाढविणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.