गेल्या काही काळत ओटीटीवर (ओव्हर द टॉप) सत्य घटनांवर बेतलेल्या सीरिज पाहायला मिळत आहेत. तर काही काल्पनिक कथेवर आधारित वेब सीरिजही गाजल्या. यात सगळ्यात जास्त क्राइम या प्रकारात मोडणाऱ्या सीरिज चर्चेत आल्या. क्राइम, सस्पेन्स या प्रकारात मोडणाऱ्या सीरिजची चर्चा होताना दिसली. अशा प्रकारात मोडणाऱ्या सीरिजला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळं आता निर्माते या प्रकारच्या सीरिजची निर्मिती करत आहेत. आता मराठीतही या प्रकारच्या चित्रपटांची तसच वेब सीरिजची निर्मिती करण्यात येत आहे. आता चर्चा सुरू आहे ती ‘आयपीसी’ या वेब सीरिजची.
काय आहे सीरिजचं कथानक? – “IPC” एक थ्रिलर मर्डर मिस्ट्री आहे. मराठी मनोरंजन सिनेइंडस्ट्रीत पहिल्यांदाच असा प्रयत्न केला गेला आहे. कोकणातील एका छोट्या गावात घडलेल्या सत्य घटनांच्या मालिकेवर ही सीरिज आधारित आहे. दरवर्षी प्रमाणे शिमगा उत्सव साजरा होत असतो. या उत्सवादरम्यान एका २० वर्षांच्या मुलीवर झालेला क्रूर हल्ला , अत्याचारानं गाव हादरतं आणि या कथेची सुरुवात होते, ज्यामुळं भयंकर अशा या घटनेचं सत्य समोर आणण्याची सुरुवात होते. सतत घडणाऱ्या संशयास्पद घटनांची साखळी सुरू होते. वेब सीरिजमध्ये कायदेशीर व्यवस्थेच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकण्यात आलाय आणि देशातील बलात्काराच्या प्रकरणांच्या ज्वलंत प्रश्नावरही सीरिज भाष्य करते.
कलाकार कोण कोण? – या वेब सीरिजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर, सुरेश विश्वकर्मा, आणि अभेनी सावंत यांच्या सोबत अनेक लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. राजेश चव्हाण यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. २५ ऑक्टोबरपासून ते अल्ट्रा झकासवर ही आयपीसी वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश चव्हाण या सीरिचे दिग्दर्शक आहेत. सीरिजची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे. अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला एक नवीन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.