सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतील तर त्यांनी येथील पर्यटन व्यावसायिकांसाठी, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा ड्रायव्हिंग, हॉटेल व्यवसायिक हे आर्थिक संकटात असून त्यांना मदतीची गरज आहे. कोरोना काळामुळे त्यांचे सर्व व्यवसायाचे नुकसान झाले आहे. त्यावेळी तुम्ही कोणतीच मदत केली नाही की त्यांचे अश्रू देखील पुसले नाहीत. आता आलाच आहात तर या पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.
पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी येऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाला तुमचा काही फायदा होणार नाही. तुम्ही बंगला तुटलाय काय ते बघायला येता आहात काय ? असा सवाल करतानाच भावाच्या शोध कार्यासाठी खेकडा शोधण्यासाठी येताय काय ! असा खोचक सवालही आमदार नितेश राणे यांनी केला.
एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू परिसरातील अधीश आणि मालवण बीचवरील नीलरत्न या दोन्ही बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या नोटिसीवरुन राणे कुटुंबीय आक्रमक झाले असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात आले आहेत.
आधी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंच्या येण्याच्या वेळी म्याव म्याव आवाज काढण्याचे प्रकरण आणि त्यानंतर संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना झालेल्या अटकेनंतर आदित्य यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं जनतेच लक्ष वेधलं आहे.