जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभाराचे वारंवार वाभाडे काढले जातात; परंतु उपलब्ध साधनसामग्री आणि कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा नेहमी प्रयत्न असतो, हे पुन्हा एकदा रुग्णालयाने सिद्ध केले आहे. एका रुग्णाच्या मानेला झालेल्या कर्करोगाची (कॅन्सरची) अतिशय अवघड आणि किचकट शस्त्रक्रिया करण्यात आली. थेट मेंदूशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्यांच्या बाजूला कॅन्सर झाला होता. अडीच तास ही शस्त्रक्रिया चालली. रत्नागिरीतील एका ३० वर्षाच्या तरुणाला मानेचा कॅन्सर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते.
मानेला ज्या ठिकाणी हा कॅन्सरचे निदान झाले, तेथूनच मेंदूशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्या जातात. यामध्ये जरा हलगर्जीपणा झाला तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. तरी ही अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात करण्याचा धाडसी निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला. रुग्णालयातील अद्ययावत ऑपरेशन थिएटरमध्येच ही शस्त्रक्रिया सकाळी सुरू झाली.
यामध्ये अॅन्को सर्जन डॉ. पालेकर, सर्जन ओंकार वेदक आणि डॉ. संघमित्रा फुले या तिघांनी मेंदूशी संपर्क येणाऱ्या रक्तवाहिन्यांना धक्का न लावता ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा असून, आहे त्या सुविधा आणि उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना चांगली सेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न आहे. गेल्या ३० वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. तरी तोच मुद्दा घेऊन अनेकजण जिल्हा रुग्णालयाची बदनामी करत आहेत, अशी खंत व्यक्त करण्यात आली.