मुंबई – गोवा महामार्गावर आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाची देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. कुंडाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा नैसर्गिक ठेवा नष्ट होण्याची भीती पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्राउंड तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युती शासनाने या कुंडांना क वर्ग पर्यटनस्थळांचा दर्जा दिला होता. त्या वेळी अंदाजे ४० लाख रुपये खर्चुन कुंडाकडे जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग, महिला व पुरुषांसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली, कुंडाच्या वरील बाजूस पत्र्याचे छप्पर आदी कामे केली होती. त्यानंतर या स्थळाच्या दुरुस्तीकडे पर्यटनखात्याने लक्ष दिले नाही.
येथील झऱ्यांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान अथवा हात-पाय धुण्याची सोय केली आहे. या झऱ्यातून बारमाही गरम पाणी वाहते. जसे मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तसे या कुंडाच्या सौंदर्याला ओहोटी लागली आहे. कुंडाच्या जवळूनच उड्डाणपुलाचा रस्ता गेल्याने हे कुंड नवीन माणसाला आता शोधावे लागते. कुंडाकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या ठिकठिकाणी निखळून पडल्या असून त्यावरील रेलिंग गायब झाले आहे. कुंडातील पाणी ज्या नाल्यात वाहून जाते तो नाला गाळाने व झुडपांनी भरल्याने पाण्याचा निचरा होत नाही.
परिणामी, नाल्यातील पाणीच उलट दिशेने कुंडात येत आहे. त्यामुळे एकेकाळी कुंडातील गंधकमिश्रित गरम पाण्याची जागा आता मातीमिश्रित दूषित थंड पाण्याने घेतली आहे. कुंडाच्यासभोवती गवत व झुडपे वाढल्याने कुंडांना बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी या स्थळाकडे पाठ फिरवली आहे. या स्थळाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
स्वतंत्र ओळख – झऱ्यातील पाण्यात गंधकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होतात, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या कुंडाला भेट देतात. वाहनचालक कुंडातील पाण्यात मनसोक्त न्हाऊन शीण घालवतात. या कुंडामुळे आरवलीला स्वतंत्र ओळख मिळाली आहे.