तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील रस्त्यांसह ग्रामीण भागातील मुंबई-गोवा महामार्गावर दिवसा-रात्री मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. मोकाट गुरांची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. या मोकाट जनावरांना पकडल्यानंतर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने उभारलेल्या गोठ्याचीही दुरवस्था झाली आहे. सुसज्ज गोठा नसल्याने पालिका मोकाट गुरांवर कारवाई करण्याकडे कानाडोळा करते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजापूर शहरातील तीव्र उताराच्या मुख्य रस्त्यासह गर्दीचे ठिकाण असलेल्या जवाहर चौकामध्ये मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. ग्रामीण भागातील राजापूर-धारतळे-पावस-रत्नागिरी या मार्गावर कशेळी, रातांबशेंडा, धारतळे, कोतापूर फाटा, सोलगाव, तेरवण फाटा, बारसू या भागामध्ये, तर महामार्गावर कोदवली, उन्हाळे, हातिवले आदी भागामध्ये रात्रीच्या वेळी काळोखात बसलेली गुरे वाहनचालकांना जवळ येईपर्यंत दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. गुरे पकडल्यानंतर कारवाई होईपर्यंत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने गोठा उभारला आहे. त्याचे छप्पर मोडकळीस आले असून पत्रे गंजले आहेत. रस्त्याच्या बाजूने त्याला झाडाझुडर्पानी वेढले आहे. दुरवस्था झालेल्या या गोठ्यामध्ये मोकाट गुरे पकडल्यानंतर ठेवल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
कारवाईनंतरही दहशत नाहीच – मोकाट जनावरे अनेकदा प्लास्टिक पिशव्या खाताना दिसतात. त्यामुळे अशा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. शहरामध्ये फिरणाऱ्या मोकाट जनावरांना चाप लावण्यासाठी त्यांच्या मालकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली होती. गेल्या दोन वर्षांमध्ये चौदा हजारांचा दंड केला आहे. या वर्षी तीन हजार रुपयांचा दंड केल्याची माहिती पालिकेने दिली. कारवाईनंतरही मोकाट जनावरांचा वावर सुरूच आहे.