शहराजवळील नाचणे-गोडावून ते शांतिनगर या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाल्यानंतर आता केवळ एक किमी अंतराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. परंतु, नियोजनाच्या अभावामुळे सतत होणारी वाहतूक कोंडीने नागरिकांसह वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी अनेकवेळा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. वाहतूक पोलिसांची नियुक्ती होणे आवश्यक असताना गेले चार दिवस येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि रस्त्याशेजारील व्यावसायिकही हैराण झाले आहेत. या कामामुळे रस्त्याशेजारील घरांमध्ये धूळ जात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गेले सहा महिने या रस्त्याबाबत येथील नागरिक, वाहनचालक प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावाने ओरड करीत आहेत. पाईपलाईन, गॅस पाईपलाईन यासाठी रस्त्याची खोदाई झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी खोदून ठेवलेले दगडही उचलले नाहीत. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येत होते. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहने चालवणे प्रचंड धोकादायक झाले होते. या सुमारे एक किमीच्या अंतरात प्रचंड खड्डे पडले होते.
हे खड्ड्यांमुळे वाहनचालकांमध्ये सुरू असलेली नाराजी दिवसेंदिवस वाढू लागल्याने ऑगस्टमध्ये या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दगड आणून ते भरण्यात आले. परंतु, त्यानंतर पडलेल्या पावसाने एवढा चिखल झाला की होते ते खड्डे बरे असे म्हणायची पाळी आली. त्यानंतरही तीन वेळा हे खड्डे भरण्यात आले. परंतु, खड्डे काही बुजवले नाहीत. गेल्या महिन्यात भरपूर खड्डे पडलेल्या ठिकाणी अखेर डांबर टाकून पॅचिंग करण्यात आले. पुढील चार दिवसांत पुन्हा पाईपलाईनच्या कामासाठी हा रस्ता एका बाजूने खोदण्याचे काम सुरू झाले. जलजीवन मिशनअंतर्गत १७ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना राबविली जाणार आहे. त्याची पाईपलाईन येथून नेण्यात येत आहे. आता तीन ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोदाई केलेली आहे. हे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी या मार्गावर गोडाऊन येथील वहाळापासून अर्ध्या बाजूचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.
मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे कोणतेही नियोजन न केल्याने अरुंद रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहतुकीमुळे सकाळी आणि सायंकाळी प्रचंड कोंडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील रस्तेही बंद झाल्याने येथील नागरिकांची ये-जा करणेही कठीण झाले आहे. शनिवारी (ता. ९) सायंकाळी येथे झालेल्या कोंडीत एसटी, दुचाकीस्वार, रिक्षाचालक अडकले होते. अखेर नाचणे ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना पाठवल्यानंतर रत्नागिरीकडे येणारी वाहतूक पांडवनगरमार्गे वळवण्यात आली. परंतु, या काळात सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्कऑर्डर – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (पीएमजेएसवाय) हे एक किमी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नाचणे ग्रामपंचायत पुलापासून ते धारेपर्यंत काँक्रिटीकरण होणार आहे. या कामाची गेल्यावर्षी निविदा प्रक्रिया झाली होती. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्कऑर्डरही दिली गेली होती. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात ऐन विधानसभा निवडणुकीत करण्यात्, आली आहे. सहा मीटरचा रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच दोन्ही बाजूला एक मीटरची बाजूपट्टी डांबराने भरण्यात येईल.
ताळमेळाचा अभाव – वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे नाचणे मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीने पोलिस प्रशासन आणि एसटी प्रशासनाला पत्रही दिले होते. त्यानंतर रत्नागिरीतील एसटी आगाराकडून शांतीनगरकडे जाणाऱ्या बसेस नाचणेवरून तर येणाऱ्या बसेस पर्यायी मार्गाने सुरू केल्या आहेत. परंतु, अन्य तालुक्यातून या मार्गे येणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहनांवर नियंत्रण नसल्यामुळे कोंडी होत आहे. नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच भय्या भोंगले यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी अवजड वाहतूक बंदचे फलक दोन ठिकाणी लावले आहेत; पण त्याकडे अनेकवेळा वाहनचालकच दुर्लक्ष करतात.
वाहतूक पोलिस कायम हवा – ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर वाहतूक पोलिस या परिसरात विशिष्ठ काळापुरतीच हजेरी लावून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. त्याचा फटका लोकांना बसतो. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मोठ्याप्रमाणात गर्दी होते. तेव्हा वाहतूक पोलिस दोन्ही बाजूला उभे राहिले, तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि वाहतूक कोंडी टळेल.