शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दापोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, केळस्कर नाका छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ शुक्रवारी १६ सप्टेंबर २०२२ ला शिव संवाद यात्रा पार पडली. या सभेकरिता दापोली दाभोळ अर्ध्या रस्त्यापासून व्यासपीठ बांधण्यात आले होते. आणि एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला होता. दुपारी ४ वाजता दापोली दाभोळ रस्ता बंद करण्यात आला होता. हे योग्य की अयोग्य? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रसाद फाटक यांनी तक्रारीतून केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार? कुठली ॲक्शन घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आझाद मैदान ओस पडलेलं असताना रस्ता अडवून सभा घेण्याची काहीही गरज नव्हती. शाळा सुटण्याच्या वेळी असे कार्यक्रम घेऊन विद्यार्थी, विद्यार्थी वाहून नेणारी वाहाने, रुग्णवाहीका, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक व जनतेचा केलेला खोळंबा किंवा केलेली गैरसोय आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सभेची परवानगी ही आझाद मैदान स.नं.४३४/१ मध्ये दिली होती.
तरीही रस्ता बंद करून सभा घेण्यात आली. सदर परवानगीमध्ये व्यासपीठ, जागा पूर्ववत करण्यासंबंधी आणि रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे इ. संबंधी अटी आणि शर्ती दिलेल्या असतात. त्या पाळल्या गेल्या नाहीत म्हणून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. सदर सर्वे नंबरमध्ये पार्किंगची सुद्धा सोय होऊ शकते.
सदर सभा आयोजकांवर रास्ता रोको आंदोलनात जी कलमे लावून गुन्हे दाखल होतात ती कलमे लावून गुन्हे दाखल करावेत. या पुढे कोठेही रस्ता बंद करून कार्यक्रम केले जातात त्यांच्यावर सुद्धा अशाप्रकारचे गुन्हे दाखल करावेत व तशा सूचना स्थानिक प्रशासकीय संस्थांना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी सहाय्यक कुलसचिव उत्तम गिम्हवणेकर यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दापोली-हर्णै या प्रमुख राज्य मार्गावरून जात असताना आदित्य ठाकरे यांची ही सभा सुरू होती. यामुळे अंत्ययात्रेत देखील अडथळा निर्माण झाला होता. कोणतरी जातंय तिकडून रस्ता मोकळा करून द्या. त्यांना जाऊ द्या, अशी सुचना करण्याची वेळी आदित्य ठाकरेंवर आली. त्यावेळी आदित्य ठाकरेंचे व्यासपीठावरून भाषण सुरू होते.