27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

मात्र परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे लक्षात आले.

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू आता उकलू लागले असून ती मूळ उत्तर भारतीय असून तिचे नाव सुखप्रित धाडिवाल असे आहे. सध्या ती नाशिकमध्ये एका बँकेमध्ये असिस्टंट बँक मॅनेजर या पदावर कार्यरत होती. मात्र तिने किल्ल्यावर येऊन आत्महत्या केली की तिला कुणी ढकलले? याचा उलगडा अजूनही झाला नसून तिच्या मित्राची रत्नागिरीचे पोलिस कसून चौकशी करत आहेत. ही एक अधूरी प्रेमकहाणी असावी, असा कयास प्राथमिकदृष्ट्या व्यक्त होत आहे. दरम्यान याविषयी गुरूवारी रात्री उशीरा जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार तिचा भाऊ गुरप्रिंतसिंह यांची फिर्याद नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. या फिर्यादीनुसार, रत्नागिरीतील एका बँकेत नोकरी करत असलेल्या तिच्या मित्राविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

रविवारी दुपारी १२.३० वा. – रविवारी (२९ जून) दुपारी एक तरूणी रत्नागिरीच्या किल्ल्यावर आली होती. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ती किल्ल्यावर पोहोचली. ती एकटीच होती, असे किल्ल्यावर असलेल्या अन्य काही पर्यटकांनी पोलिसांना सांगितले. साधारणपणे १२.३० वाजण्याच्या सुमारास सेल्फी पॉईंटवरून ती खाली कोसळली. तत्पूर्वी तिने तेथे असलेल्या एका तरूणाकडून आपणाला एक कॉल करायचा आहे, कृपया मला तुमचा मोबाईल फोन द्या, असे सांगितले होते. त्या व्यक्तीने तिला मोबाईल फोन दिला. तिने त्यावरून कोणाशीतरी संपर्क साधला आणि काही वेळातच फोन परत केला.

ओढणी आणि चप्पल – किल्ल्यावरून खाली कोसळलेल्या या तरूणीच्या पायातील चप्पल आणि ओढणी तेथेच बाकड्याजवळ असल्याचे दिसून आले. तेथे बसलेल्या एका पर्यटक दांपत्याने ही माहिती पोलिसांना दिली. रविवारी दुपारपासून तिचा शोध सुरू झाला. रत्नागिरी पोलिस, रत्नागिरीतील नामवंत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खवळलेल्या समुद्रात ती काही सापडली नाही. पोलिस तिचा कसून शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे लक्षात आले.

नाशिकमधील तक्रार – काहीच पत्ता लागत नसल्याने पोलिसांनी मागील २-३ दिवसांत कोणी तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे का, याचा शोध सुरू केला. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस स्थानकात अशी तक्रार नव्हती. त्यामुळे शोध घेणे अवघड बनले असतानाच मंगळवारी नाशिकमधील एक तरूणी बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळले आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, रत्नागिरीतील किल्ल्यावरून कोसळलेली ही तरूणी नाशिकची तर नाही ना? या अँगलने तपास सुरू केला.

सुतावरून स्वर्ग – पोलिस चाणाक्षपणे तपास करत होते. सुतावरून स्वर्ग गाठत त्यांनी एक एक धागा उलगडला आणि अखेर ही तरूणी नाशिकमधून बेपत्ता झालेली तरूणी असावी, अशा कयासापर्यंत तपास पोहोचला. दरम्यान या तरूणीचे वडील आणि अन्य नातेवाईक बुधवारी रात्री रत्नागिरीत येवून दाखल झाले आणि या प्रकरणावर अधिक प्रकाश पडला.

नाशिकमधील बँक अधिकारी – दरम्यान नाशिकमध्ये जी तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती, तिचे नाव सुखप्रित प्रकाशसिंह धाडिवाल असे असल्याचे कळले. ही तरूणी पंचवीशीतीलं असून एका बँकेमध्ये ती असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीला होती. तिचा कॉलेजमधील एक मित्र रत्नागिरीला असतो. तोही बँकेत अधिकारी आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असावे. बंगलोरमध्ये मणिपाल कॉलेजमध्ये शिकत असताना या दोघांची मैत्री झाली आणि तिचे रूपांतर पुढे प्रेमात झाले असावे, इतपत माहिती मिळविण्यात पोलिसांना यश आले. बुधवारी या मुलीचे वडील प्रकाशसिंह आणि भाऊ गुरप्रितसिंह आणि अन्य काही नातेवाईक मंडळी नाशिकहून रत्नागिरीत दाखल होताच तपासाला अधिक गती मिळाली.

घरात सापडली चिठ्ठी – नाशिकमध्ये सुखप्रितकौर प्रकाशसिंह धाडिवाल बलवंतनगर परिसरात राहत होती. दोन दिवस ती न दिसल्याने शेजाऱ्यांनी तिची खोली उघडून पाहिले असता त्यांना ती आढळली नाही. घरात चिठ्ठी सापडली.

मी मोठ्या संकटात…. – या चिठ्ठीमध्ये सुखप्रितने आपण संकटात आहोत. कोणाला सांगू शकत नाही आणि काय करू ते मला समजत नाही. त्याने घात केला, मला ब्लॅकमेलिंग करण्यात येत आहे, असे लिहिले होते. ही चिठ्ठडी मिळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. तसेच सुखप्रितच्या वडिलांशी संपर्क साधला. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचे आहेत. सध्या ते हरियाणा येथे होते. तेथून ते लगेच निघाले. मंगळवारी नाशिकमध्ये पोहोचले आणि त्यांनंतर बुधवारी ते रत्नागिरीत येऊन पोहोचले. गुरूवारी त्यांनी पोलिसांसमक्ष रत्नदुर्ग किल्ला आणि आसपासच्या परिसराची पाहणी केली.

आत्महत्या करायची तर – दरम्यान ही प्रेमकहाणी असावी, असा संशय आहे. तिने आत्महत्या केली असावी यावर तिच्या वडिलांचा विश्वास नाही. आत्महत्या करायची असती तर ती रत्नागिरीला कशाला आली असती? माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही. तिच्या मित्राला भेटण्यासाठी ती याआधीही रत्नागिरीत – येऊन गेली होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सर्वांसमोर सांगितले. माझ्या मुलीची फसवणूक झाली आहे. ‘हराम जाद्याने घात केला आहे’ असे सांगताना प्रकाशसिंह यांना अश्रू अनावर झाले.

संशयाची सुई तरूणावर – त्यांनी त्यांच्या चौकशीत पुढे तिच्या एका मित्रावर संशय व्यक्त केला. त्या तरूणांवर संशयाची सुईदेखील व्यक्त केली. हा तरूण तिचा कॉलेजपासूनचा मित्र असून त्याला भेटण्यासाठी ती याआधीही रत्नागिरीला येऊन गेली होती, असेदेखील त्यांनी सांगितले. तिला कोणीतरी ढकलले आहे, असा संशयदेखील वडिलांनी जाहीरपणे सर्वांसमोर बोलताना व्यक्त केला. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीच्या एका बँकेत नोकरी करणाऱ्या तिच्या मित्राची/प्रियकराची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्या तरूणाने ती आपल्याला आत्ता भेटायला आल्याचा इन्कार केला आहे. आपण रत्नागिरीत नव्हतो, बाहेरगावी होतो, असे त्याने सांगितल्याचे कळते. त्यामुळे किल्ल्यावरून कोसळलेली ही तरूणी कोण? याचा उलगडा करण्यात यश आले असले तरी तिच्या मृत्यूविषयीचे गूढ अजूनही कायम आहे. तिच्या प्रियकराची कसून चौकशी केली जात आहे, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असे रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक सतिश शिवरकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विशे, रायटर वैभव शिवलकर, बीट अंमलदार भाऊ पाटील, कुशल हातीसकर, अमृत अवघडे, अमोल भोसले, दिपू साळवी या पोलिसांचे पथक या अवघड प्रकरणाचा गुंता सोडवत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular