मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रसिद्ध सोने-हिरे व्यापारी कीर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह गुहागर तालुक्यातील आबलोली-खोडदे मार्गावरील पुलाजवळ गोणीमध्ये टाकलेल्या स्थितीत आढळला आहे. कोठारी यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे आणि अधिकचा तपास सुरू केला आहे.
कीर्तीकुमार कोठारी हे सोमवारी शहरातील रामआळी परिसरात फिरत असताना अनेक दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. मात्र रात्री गोखले नाक्यापर्यंत गेल्यानंतर ते गायब झाले. हे रत्नागिरी येथील सोन्याच्या व्यापाऱ्यांच्या ऑर्डर घेण्यासाठी नेहमी ठाणे येथून येत होते. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनला ट्रेस केले असता, ते जिल्ह्याबाहेर आढळून आले. त्यामुळे हे नक्की अचानक गेले कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्या संशयास्पद प्रकारानंतर पोलिसांनी आपली चक्रे सर्व बाजूने फिरवून तपासाला सुरुवात केली.
कोठारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ठाणे येथून रत्नागिरीत आले असता १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१० वाजता ते शहरातील आठवडा बाजार येथील श्रद्धा लॉज या त्यांच्या नेहमीच्याच लॉजवर उतरले होते. काही वेळाने ते सोने व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळीत गेले. दिवसभर त्यांच्या सोने व्यापाऱ्यांशी गाठीभेटी सुरू होत्या. मात्र दिवस मावळत आला तरी ते लॉजवरच न परतल्याने एकच खळबळ उडाली.
कोठारी यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांनी उचलला नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाला शंका आल्याने ते रत्नागिरीमध्ये आले आणि वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कीर्तिकुमार यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने होते. ठाणे येथील प्रख्यात सोने व्यापारी असलेले कोठारी हे गेले अनेक वर्ष व्यवसायानिमित्त रत्नागिरीत येत असत. दरम्यान, आता कीर्तीकुमार यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने रत्नागिरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.